Join us

राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबरच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या ताणाबरोबरच बोर्डाच्या परीक्षांचे काय होणार, याची चिंता लाखो विद्यार्थी, पालकांना लागली आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही या प्रश्नावर तोडगा काढला नाही. सरकारने आता लवकरात लवकर परीक्षांसंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये म्हणाले की, कोरोना साथीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पण कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही, याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला, त्या मुख्यमंत्र्यांना या परीक्षांचे महत्त्व आहे की नाही, हाही प्रश्न आहे. तीन नापासांनी आपले मार्क एकत्र करून पहिला नंबर आलेल्याला हरवले आणि राज्यात सरकार स्थापन केले. पण अशी लबाडी विद्यार्थ्यांना करता येणार नाही, असेही उपाध्ये म्हणाले.