Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०२२-२३ वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

By संजय घावरे | Updated: November 16, 2023 20:56 IST

वंदना गुप्ते, ज्योती सुभाष यांना नाट्य क्षेत्रासाठी, तर मोरेश्वर निस्ताने, पं. ऋषिकेश बोडस यांना उपशास्त्रीय संगीत पुरस्कार

मुंबई - २०२२-२०२३ या वर्षातील राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. राज्य सांस्कृतिक पुरस्कार समितीने निवड केल्यानुसार नाटक, उपशास्त्रीय संगीत, चित्रपट, कंठसंगीत, लोककला, शाहिरी, नृत्य, किर्तन/समाज प्रबोधन, वाद्यसंगीत, कलादान, तमाशा, आदिवासी गिरीजन या विभागांमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

२०२२ वर्षातील नाटकासाठीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराने वंदना गुप्ते आणि २०२३मधील नाटकासाठीच्या पुरस्काराने ज्योती सुभाष यांना गौरविण्यात येणार आहे. याखेरीज उपशास्त्रीय संगीतासाठी मोरेश्वर अमृतराव निस्ताने, पं. ऋषिकेश बोडस, कंठसंगीतासाठी अपर्णा मयेकर, रघुनंदन पणशीकर, लोककलेसाठी हिरालाल रामचंद्र सहारे, किर्तनकार भाऊराव थिटे महाराज, शाहिरीसाठी शाहिर जयवंता अभंगा रणदिवे, शाहिर राजू राऊत, नृत्यासाठी लता सुरेंद्र, सदानंद राणे, चित्रपटासाठी चेतन दळवी, निशिगंधा वाड, किर्तन/समाज प्रबोधनासाठी प्राची गडकरी, ह.भ.प. अमृत महाराज जोशी, वाद्यसंगीतासाठी पं. अनंत केमकर, शशिकांत सुरेश भोसले, कलादानासाठी प्रा. डॉ. संगीता राजेंद्र टेकाडे, यशवंत रघुनाथ तेंडोलकर, तमाशासाठी बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर), उमा खुडे, आदिवासी गिरीजनसाठी भिकल्या धाकल्या धिंडा, सुरेश नाना रणसिंग यांची अनुक्रमे २०२२ आणि २०२३ या वर्षांतील पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. वरील १२ क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ सेवा करणाऱ्या कलाकारांचा सरकारतर्फे राज्य सांस्कृतिक पुरस्काराने गौरव करण्यात येतो.