मुंबई : प्रदेश भाजपची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा विधान परिषदेची संधी न मिळालेल्या प्रमुख नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते हे पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांची चर्चा करून कार्यकारिणीला अंतिम स्वरूप देत आहेत. माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना महत्त्वाची पदे दिली जाऊ शकतात. मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता तर तावडे आणि बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवले जाईल अशी चर्चा होती पण तसे झाले नाही. माजी मंत्री एकनाथ खडसे यांना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळात ठेवताना त्यांच्या स्नुषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना पदाधिकारी केले जाण्याची शक्यता आहे.माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, सुभाष देशमुख, गिरीश महाजन, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, आमदार सुजितसिंह ठाकूर, आ. देवयानी फरांदे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
प्रदेश भाजपची नवीन कार्यकारिणी लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 04:45 IST