Join us  

मुंबईत लवकरच अत्याधुनिक कर्करोग काळजी केंद्र; सल्लागाराची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:22 PM

परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून कर्करोग आजाराने ग्रस्त शेकडो रुग्ण उपचरासाठी मुंबईत येत असतात.

मुंबई - कर्करोगाने ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार केला आहे. या अंतर्गत अत्याधुनिक कर्करोग काळजी केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या केंद्रात कर्करोगाने ग्रस्त गरीब, दुर्बल घटकातील रुग्णांना अचूक, अत्याधुनिक, माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यासाठी अद्ययावत, "प्रोटॉनबीम थेरपी''चा वापर करण्यात येणार आहे. 

केमोथेरपीचे सर्व दुष्परिणाम टाळून शरीरातील इतर पेशींना न मारता फक्त कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणारी व केवळ ट्युमरला लक्ष्य करणारी रेडिएशन प्रकारातील "प्रोटॉनबीम थेरपी'' ही कर्करोगावर सर्वात अत्याधुनिक व प्रभावी उपचारपद्धती मानली जाते. या उपचार पद्धतीमुळे, कमीत कमी डोस देऊन अधिकाधिक कर्करोगाच्या पेशी नष्ट करणे शक्य होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने मंजुरीसाठी आणला आहे.

परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून कर्करोग आजाराने ग्रस्त शेकडो रुग्ण उपचरासाठी मुंबईत येत असतात. त्यामुळे टाटा कर्करोग रुग्णालयावर मोठा ताण पडतो. मात्र कर्करोगाने ग्रस्त रुग्णांसाठी स्थापन करण्यात येत असलेल्या या केंद्रामुळे टाटा कर्करोग रुग्णालयावर कर्करोग पिडीत रुग्णांचा पडणार ताण कमी होण्यास फार मोठी मदत होणार आहे.

यासाठी सल्लागाराची नियुक्ती....

या केंद्रासाठी पालिका शंभर कोटी रुपये खर्च करणार आहे. या अंतर्गत कर्करोग ग्रस्त रुग्णांना "प्रोटॉनबीम थेरपी" द्वारे उपचार देण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक तांत्रिक तपशील, यंत्र सामग्री तयार करणे, प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करणे, हा प्रकल्प नियोजित कालावधीत सुरू करून पूर्ण करणे, तीन एकर जागा (१० हजार चौ.मी.) असलेला भूखंड उपलब्ध करणे, "प्रोटॉनबीम थेरपी"साठी सर्वेक्षण करणे, अत्याधुनिक उपकरणासाठी सहकार्य करणे, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन आदी कामांसाठी 'प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार' म्हणून क्रसना डायग्नोस्टिक्स लि. यांची नेमणूक करण्यात येणार आहे. पालिकेकडून या कामासाठी दोन कोटी ८० लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे.

टॅग्स :कर्करोगमुंबई