Join us

शिष्यवृत्तीचे पैसे अडकवणे विद्यापीठाला भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 01:59 IST

समाजकल्याण विभागाकडून कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना वेळेत न देता विभागाच्या खात्यात साठवून ठेवणे हा दखलपात्र गुन्हा आहे. ही बाब गंभीर असून या प्रकरणी मुंबई विद्यापीठ प्रशासनाविरोधात समाजकल्याण विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव हे विद्यापीठाचे प्रशासकीय प्रमुख असल्याने ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल होणार असून मुंबई विद्यापीठ प्रशासनाने पीडित विद्यार्थ्याला त्याच्या शिष्यवृत्तीच्या दुप्पट रक्कम द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने समाजकल्याण विभागाकडे केली आहे.मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या बँक खात्यात १५ आॅगस्ट २०१५ रोजी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शासनाच्या समाजकल्याण विभागाकडून शिष्यवृत्ती जमा करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी वारंवार विचारणा करूनही तेथील लिपिक विठ्ठल सुंदरडे यांनी उडवाउडवीची उत्तरे देत मागील ५ वर्षांपासून त्यांच्या हक्काच्या शिष्यवृत्तीच्या रकमेपासून वंचित ठेवल्याचे समोर आले आहे.यासंदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने विभाग प्रमुख शेफाली पांड्या यांची भेट घेत त्यांच्या हे प्रकरण निदर्शनास आणले. तसेच याचा पाठपुरावा समाजकल्याण विभागाकडे केला असता सहायक आयुक्तांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाच्या विभागप्रमुखास दिल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ नुसार प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सहायक आयुक्तांनी दिली आहे.मनविसेच्या शिष्टमंडळाने या प्रकरणाचा पाठपुरावा करत यासंबंधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर आणि कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांना प्रत्यक्ष भेटून माहिती दिली होती. यावर त्यांनी विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देऊ असे आश्वासन दिले, मात्र महिना उलटूनही त्याची पूर्तता झाली नाही. उलट विद्यार्थ्याला लिपिकाकडून धमकीचे फोन येऊ लागले आहेत.- संतोष धोत्रे, अध्यक्ष, मुंबई विद्यापीठ, मनविसे

टॅग्स :मुंबई विद्यापीठ