Join us  

शाळा सुरू; कुठे फुले देऊन, तर कुठे मिकी माउसकडून मुलांचे स्वागत...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:36 AM

कुठे नवा गणवेश, नवे दप्तर तर कुठे गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढला आणि शाळेला चाललो आम्ही, म्हणत मुले शाळेच्या दिशेने निघाली.

मुंबई - कुठे नवा गणवेश, नवे दप्तर तर कुठे गेल्या दोन महिन्यांपासून कपाटात विसावलेला गणवेश विद्यार्थ्यांच्या अंगावर चढला आणि शाळेला चाललो आम्ही, म्हणत मुले शाळेच्या दिशेने निघाली. शुक्रवारी शाळेचा पहिलाच दिवस असल्याने, शहरातील सर्व शाळांच्या परिसरात मुलांचा किलबिलाट होता. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रवेशोत्सव साजरा केला गेला. कुठे फुले, तर कुठे मिकीने गोष्टीची पुस्तके देऊन स्वागत केल्याने मुले हरखून गेली. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांमध्ये उत्साह, चैतन्याचे वातावरण होते.प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. बोरीवली-गोराई येथील प्रगती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्येही यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका सुनिता वाघ आणि प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका अरूणा खडपे व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत केले. त्याचप्रमाणे, चिमुकल्यांचा आवडता कार्टुन असलेल्या मिकी माउसच्या उपस्थितीने सर्वच विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढला. मिकीच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके, पाठ्यपुस्तके आणि चॉकलेट देण्यात आली. मुख्याध्यापक व शाळेचे विश्वस्त चंद्रकांत नेटके यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटपही करण्यात आले. जोगेशवरीच्या अस्मिता विद्यालयातही शिक्षकांनी विद्यार्थ्यांची ओवाळणी करून त्यांचे स्वागत केले. सोबतच फुले वाटली. प्रवेशोत्सवाचे हेच चित्र परळ येथील शिरोडकर शाळा, तसेच मुंबई शहर व उपनरातील अन्य शाळांमध्येही पाहायला मिळाले.लहान मूल म्हणजे नाजूक कळी. संस्कार, शिक्षणाच्या पाण्याचा शिडकावा झाल्यावरच ही कळी उमलते, फुलते. त्यांना शाळेची गोडी लागावी, नवा गणवेश, नवी पुस्तके, नवे दप्तर असे सगळेच नवनवे घेऊन शाळेत आलेल्या या मुलांना नेहमीच शाळा हवीहवीशी वाटावी, यासाठी शुक्रवारी शाळेच्या पहिल्याच दिवशी या गोडगोजिऱ्या फुलांचे स्वागत शिक्षकांनी त्यांच्याइतकीच सुंदर फुले देऊन केले.शाळा प्रवेशोत्सवांतर्गत शिक्षकांनी केलेल्या या उत्स्फूर्त स्वागताने मुले भारावून गेली. गुरू-शिष्यामधील नाते दृढ करू पाहणारे परळ येथील शिरोडकर शाळेतील टिपलेले हे उत्साहवर्धक दृश्य.

टॅग्स :शाळामुंबई