Join us

डेडलाइन संपली तरी कामे सुरूच

By admin | Updated: June 1, 2015 02:13 IST

मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची मुदत रविवारी संपुष्टात आली आहे. मात्र त्यानंतरही अनेक भागात ही कामे सुरूच असल्याचे दिसून आले आहे

नवी मुंबई : मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याची मुदत रविवारी संपुष्टात आली आहे. मात्र त्यानंतरही अनेक भागात ही कामे सुरूच असल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी पदपथ आणि नाले दुरुस्तीची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. कूर्मगतीने सुरू असलेल्या या कामांमुळे पादचारी व वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे.महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सुरू असलेली मान्सूनपूर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. तसेच विविध शहर उपयोगी सेवा (युटिलिटी सर्व्हिसेस) पुरविणाऱ्या संस्थांना २५ मेपर्यंत खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र मुदत संपली तरी शहराच्या अनेक भागात ही सर्व कामे आजही सुरू असल्याचे दिसून आले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागातील पदपथ व नाल्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी नाल्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी पदपथ उखडून ठेवले आहेत. पामबीच मार्गावर वाशी सेक्टर १७ येथील अरेंजा कॉर्नरच्या वाहतूक पोलीस चौकीजवळ नाल्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने या चौकातील वाहतुकीला त्याचा अडथळा निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे कोपरखैरणे सेक्टर २२ येथील मुख्य रस्त्यालगतच्या पदपथांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे कामही अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसत आहे. घणसोली, ऐरोली तसेच वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरूळ आदी परिसरात मुदत संपली तरी कामांचा धडाका सुरूच असल्याचे दिसून आले आहे. (प्रतिनिधी)