Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्यक्ष शाळा सुरु करा ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST

पार्ले टिळक असोसिएशनच्या शिक्षिकांच्या ‘अभिरूप संसदे’मध्ये मांडण्यात आले विधेयकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पार्ले टिळक ...

पार्ले टिळक असोसिएशनच्या शिक्षिकांच्या ‘अभिरूप संसदे’मध्ये मांडण्यात आले विधेयक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पार्ले टिळक असोसिएशनच्या शिक्षकांनी अभिरूप संसदेचे आयोजन करून प्रत्यक्ष शाळा सुरु करा आणि १५ ते ३० टक्के प्रमाणात ऑनलाईन माध्यमाचा समावेश शालेय शिक्षणात व्हावा, असे विधेयक एकमुखाने मांडले. पाटिविअच्या पाच शाळांतील पंधरा शिक्षिका यात सहभागी झाल्या होत्या. आवश्यक ती सर्व काळजी घेऊन, प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात याव्यात आणि त्याचवेळी शालेय शिक्षणात यापुढे मर्यादित स्वरूपात ऑनलाईन माध्यमाचा समावेश करण्यात यावा, अशी विनंती या कार्यक्रमाद्वारे शासनाला करण्यात आली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाईन माध्यमाचा वापर करावा लागणार आहे. इंटरनेट, तंत्रज्ञानाने जग व्यापले असून, त्याचा उपयोग पुढील आयुष्यात नक्कीच होणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणात ऑनलाईन माध्यमाचा वापर हा अत्यावश्यकच आहे. मात्र तो मर्यादित स्वरूपात असावा, असा सूर या चर्चेमधून पुढे आला. या अभिरूप संसदेत पाटिवि मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता धिवार यांनी शिक्षणमंत्री म्हणून तर माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका लतिका ठाकूर यांनी सभापती म्हणून काम पहिले.

...तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल

गेले दीड वर्ष ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु आहे, परंतु आता प्रत्यक्ष शाळा सुरू करून शालेय अभ्यासक्रमातील काही भाग यापुढेही ऑनलाईन माध्यमातून शिकवला जायला हवा, असे मत शिक्षकांनी मांडले. दरम्यान, अभिरूप संसदेत कोविडकाळात शिक्षणक्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ऑनलाईन माध्यम उपयुक्त ठरले. या माध्यमामुळे शिक्षक आणि विद्यार्थी तंत्रस्नेही बनले. हे माध्यम मर्यादित स्वरूपात वापरल्यास वाहतुकीसारख्या इतरही व्यवस्थांवरील ताण काही प्रमाणात कमी होऊ शकेल तसेच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करता येईल, असे सरकारी बाजूच्या सदस्यांनी सांगितले.

ऑनलाईन माध्यमाचे दुष्परिणाम

तर विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रचलित शालेय शिक्षण पद्धतीला ऑनलाईन माध्यम हा पर्याय नाही. ह्या माध्यमाचे दुष्परिणामही अनेक आहेत. विद्यार्थ्यांना आणि काही प्रमाणात शिक्षक, पालकांवरही कशाप्रकारे मानसिक ताण येतोय, व्यायामाअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, शिक्षक प्रशिक्षण, मूल्यमापन यात काय समस्या येतात, याची तपशीलवार माहिती दिली.

कोट

देशाला प्रगत देशाचं स्थान मिळवून देण्यासाठी सद्यपरिस्थितीत या विधेयकाला सगळ्यांनीच पाठिंबा द्यायला हवा.

- सुनीता धिवार, मुख्याध्यापिका, प्राथमिक विभाग