Join us

मनपाच्या सर्व शाळांत आठवीचे वर्ग सुरू करा

By admin | Updated: October 30, 2015 00:37 IST

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निकालानुसार मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग तत्काळ सुरू करण्याची मागणी समान

मुंबई : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निकालानुसार मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता आठवीचे वर्ग तत्काळ सुरू करण्याची मागणी समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीने केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण सर्वांना सक्तीचे आणि मोफत असावे, असे शिक्षण हक्क कायदा २००९ सांगतो. मात्र सातवीपर्यंतचे वर्ग स्थापन केलेली पालिका या कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.पालिकेच्या बहुतांश शाळांत इयत्ता सातवीपर्यंतचेच शिक्षण मिळते. परिणामी इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खासगी शाळांकडे वळावे लागते. मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांची फी परवडत नाही. त्यामुळे सातवीनंतरच बहुतेकांची शाळा सुटते. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्याला आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, या शिक्षण हक्क कायद्याचा भंग होत असल्याचे संघटनेचे घनश्याम सोनार यांंनी सांगितले.सोनार यांनी सांगितले की, कायद्यानुसार महापालिकेने प्रत्येक शाळेत किमान पहिली ते आठवीपर्यंतचे सक्तीचे आणि मोफत गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायची तरतूद करायला हवी. ज्यामुळे सातवीनंतर विद्यार्थ्यांवर खासगी शाळेत जाण्याची वेळ येणार आहे. यासंदर्भात आयोगाकडे तक्रार केली असता मनपाने ठरावीक कालमर्यादेत कार्यक्रम आखून शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निकाल देण्यात आला. शिवाय विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षक, शिक्षक कर्मचारी, वर्ग खोल्या, संगणक कक्ष, प्रयोग शाळा, वाचनालय अशा विविध सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले.