Join us

स्थायी समितीत ‘कचरा’ पेटला

By admin | Updated: November 8, 2014 00:48 IST

शहरातील कचऱ्याच्या समस्येचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याबद्दल नगरसेवकांनी संताप व्यक्त केला तसेच ठेकेदार नियुक्तीची मागणी करण्यात आली.

नवी मुंबई : शहरातील कचऱ्याच्या समस्येचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याबद्दल नगरसेवकांनी संताप व्यक्त केला तसेच ठेकेदार नियुक्तीची मागणी करण्यात आली. ठेकेदाराची मुदत संपून जवळपास अडीच वर्षे उलटली तरी नवीन ठेकेदाराची नियुक्ती न झाल्यामुळे शहरात कचरा वेळेवर उचलला जात नाही. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. ‘लोकमत’ने याविषयी वारंवार आवाज उठवला होता. निवडणुका संपल्यानंतर शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीतही वाशीतील नगरसेवक राजू शिंदे यांनी कचरा वेळेवर उचलण्यासाठी नवीन ठेकेदाराची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी केली. विठ्ठल मोरे व इतर नगरसेवकांनीही या प्रश्नाबाबत संताप व्यक्त केला.घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी सांगितले की, ठेकेदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. परंतु ठेकेदाराने प्रतिमेट्रिक टनास २,१५० रुपये दर मागितला. प्रशासनाने पाठविलेल्या तज्ज्ञांनी १,४४९ ते १,७०० पर्यंतचा दर योग्य असल्याचे मत व्यक्त केल्याने पुन्हा निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट केले. परंतु नगरसेवकांनी पुन्हा निविदा मागवण्यापेक्षा जर ठेकेदार दर कमी करीत असेल तर त्यास काम देण्याचे मत व्यक्त केले. सभापती सुरेश कुलकर्णी यांनी कायदेशीर बाबी पडताळून निर्णय घेण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या. (प्रतिनिधी)