Join us  

शिवाजी पार्कमध्ये उभं उद्यान बहरणार; मियावाकी पद्धतीचा वापर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 1:43 AM

हरित पट्टा निर्माण करण्यावर महापालिकेचा भर

मुंबई : मुंबईतील प्रदूषणाचा प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेने हरित पट्टा निर्माण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे़ या अंतर्गत मियावाकी पद्धतीने नागरी वन तयार करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे़ या अंतर्गत दादर येथे शिवाजी पार्क नजीकच्या बस स्टॉपवर व्हर्टीकल गार्डन बहरणार आहे.मुंबईतील हरित पट्टा नष्ट होत चालला आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या जागेवर अतिक्रमण होत आहे. मात्र, पर्यावरणात समतोल राखण्यासाठी वृक्षसंपदा असणे आवश्यक असल्याने ३३ कोटी झाडे लावण्याचा संकल्प सरकारने केला होता. त्यानुसार, महापालिकेलाही आपल्या आवारात ५,९७७ झाड लावण्यास सांगण्यात आले होते, परंतु मुंबईत जागेची कमतरता असून, काँक्रिटीकरणमुळे झाडे लवकर उन्मळून पडतात. यावर उपाय म्हणून मियावाकी पद्धतीने पालिकेने अवलंबिला आहे.त्याचबरोबर शिवाजी पार्क परिसरातील जुन्या महापौर बंगल्यापासून व्हर्टीकल गार्डन म्हणजे उभ्या उद्यानाचा प्रयोगही केला जाणार आहे़या परिसरातील आठ बस थांब्यावर अशा प्रकारे उभे उद्यान बहरणार आहे. तसेच यामध्ये ठरावीक अंतरावर बैठक व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि बगीचा असलेली ४.५ कि़मी़ लांबीचे पदपथ माहिम कॉजवे ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत तयार करण्यात येणार आहे. दुभाजक, वाहतूक बेटांवरही छोटे बगीचे बहरणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले.राज्यात भाजप सरकार सत्तेवर असताना ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता.मुंबई महापालिकेला सुमारे सहा हजार झाडे लावण्याचे लक्ष्य देण्यात आले होते.ही झाडे लावण्यासाठी पालिका तब्बल ३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. एका झाडासाठी ५९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत.कमी जागेत जास्त झाडे लावण्याची मियावाकी ही जपानी पद्धत अवलंबिण्यात येणार आहे.