Join us

खासगी वाहनांमुळे एसटी तोट्यात!

By admin | Updated: February 5, 2015 22:47 IST

बसस्थानकापासून दोनशे मीटरचा परिसर एसटीसाठीच राखीव झोन असेल, तेथे प्रवासी पळवापळवी अजिबात खपवून घेतली जाणार नाही.

कामोठे : बसस्थानकापासून दोनशे मीटरचा परिसर एसटीसाठीच राखीव झोन असेल, तेथे प्रवासी पळवापळवी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. या ठिकाणी खासगी वाहतूक करणाऱ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे. तरीही पनवेल बसस्थानकच्या बाजूला खासगी ट्रॅव्हल्स उभ्या राहत आहेत.मुंबई आणि पुणे या दोन महानगरांकरिता पनवेल हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बस स्थानकातून दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करीत असले तरी आता या संख्येत घट होत आहे. याला कारणीभूत खासगी ट्रॅव्हल्स आहेत. बसस्थानकाच्या समोरच खासगी ट्रॅव्हल्सची कार्यालये थाटण्यात आली आहेत. या परिसरातून रोज पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, सांगली, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, नांदेड, कोल्हापूर आदी ठिकाणी खासगी बस वाहतूक जाते. वास्तविक खासगी बसने एका ठिकाणाहून प्रवासी भरल्यानंतर मध्ये थांबा घेऊन प्रवासी घेणे नियमबाह्य आहे. असे असतानाही ते मुंबईपासून पनवेलपर्यंत प्रवासी घेत येतात. वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर, खारघर, कामोठे, कळंबोली आणि पनवेलमध्ये त्यांनी अनधिकृत थांबे केले आहेत. पनवेल बसस्थानकाच्या बाजूला या ट्रॅव्हल्सवाल्यांनी दुकानेच थाटली आहेत. बेकायदेशीर झोपड्यांचा व्यावसायिक वापर करून दररोज शेकडो प्रवाशांना तिकीट बुक करून दिले जाते. वास्तविक पाहता पनवेल बसस्थानकापासून ४० ते ५० मीटर अंतरावर रात्रीच्या वेळी या खासगी ट्रॅव्हल्स थांबतात. आणि मोठमोठ्याने आरोळ्या ठोकत ते एसटीच्या प्रवाशांना बोलावतात. त्यामुळे महामंडळाच्या हातून हजारो प्रवासी तर जातातच त्याचबरोबर लाखोंचा तोटा होत आहे. पनवेल बसस्थानकातील खासगी ट्रॅव्हल्सच्या थांब्यावर आगार व्यवस्थापनाने सातत्याने आक्षेप नोंदवला आहे. यावर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र दरमहिन्याला पनवेल वाहतूक शाखा आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात पाठविण्यात येत आहे. मात्र त्यावर ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. ४अवजड वाहनांप्रमाणेच खासगी ट्रॅव्हल्सना कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटा या दरम्यान १९९६ साली तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना काढून प्रवेश बंदी केली आहे. असे असतानाही या आदेशाचे पालन कधीच झाले नाही आणि आजही होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. ४वाहतूक पोलिसांना हप्ते मिळत असल्याचे परमार या कर्मचाऱ्यावर पडलेल्या ट्रॅपवर वरून स्पष्ट झाले आहे. त्यातून महिन्याला लाखो रुपयांचा मलिदा पनवेल आणि कळंबोली वाहतूक शाखेला मिळत आहे. त्यामुळे जुजबी कारवाई करून त्यांना सोडून दिले जात आहे. ४बेकायदेशीर व्यवसायावर आळा घालण्याच्या सूचना देणारे पोलीस आयुक्त के.एल. प्रसाद मात्र याबाबत संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.खासही ट्रॅव्हल्सबाबत आमच्याकडे पनवेल बस आगारातून तक्र ारी आल्या आहेत. त्यानुसार आम्ही कारवाईसुद्धा करतो. प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता ट्रॅव्हल्सना पर्यायी थांबा देण्याकरिता पोलीस आयुक्त आणि परिवहन अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्यानुसार त्यांना वेगळ्या ठिकाणी थांबा ठरवून देण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत.- मोहन पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा