Join us

‘एसटी’च्या नोकरीत दारू, तंबाखू नाही

By admin | Updated: June 5, 2015 01:34 IST

एसटी महामंडळात चालकांच्या ७ हजार ६३७ पदांकरिता भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या उमेदवारांना नोकरीत असेपर्यंत नशापाणी करणार नाही

मुंबई : एसटी महामंडळात चालकांच्या ७ हजार ६३७ पदांकरिता भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून या पदांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या उमेदवारांना नोकरीत असेपर्यंत नशापाणी करणार नाही आणि तंबाखू खाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक केले जाईल, असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.रावते म्हणाले की, गोमांस बंदीमुळे राज्यात कुणी काय खावे व खाऊ नये यावरून घटनात्मक अधिकारांची चर्चा सुरू आहे. मात्र एसटीतील चालकांच्या भरतीमध्ये नोकऱ्या देणाऱ्या प्रशासनाला काही अटीसापेक्ष भरती करण्याचा अधिकार असल्याने व्यसनांपासून दूर राहण्याची प्रतिज्ञापत्रे देण्यास भाग पाडले जाईल. चालकांच्या ७ हजार ६३७ पदांकरिता ७० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. ज्यांची निवड केली जाईल त्यांना प्रतिज्ञापत्र देण्याचे बंधन असेल. प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर कठोर कारवाई केली जाईल. एसटीच्या चालकाच्या हाती प्रवाशांचे जीव असतात. नवीन भरतीत कुठलेही व्यसन असलेली व्यक्ती नियुक्त होऊ नये, असा प्रयत्न आहे. यापूर्वी सेवेत दाखल झालेल्या चालकांचे तंबाखूचे व्यसन सुटावे याकरिता प्रयत्न केले जातील. (विशेष प्रतिनिधी)आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्यपरिवहन विभागात कारकुनांच्या ७५० जागा भरण्यात येणार असून त्यामध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना प्राधान्य देण्याकरिता नवी श्रेणी निर्माण केली जाणार आहे. नोकरभरतीमधील आरक्षणांना धक्का न लावता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरीत प्राधान्य देण्याचा हा निर्णय अन्य खात्यांतही लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे रावते यांनी सांगितले. आतापर्यंत राज्यात ७० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.