Join us  

एसटी महामंडळ खासगीकरणाकडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:01 AM

खासगी कंपनी करणार बसची बांधणी : निविदा प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने माईल्ड स्टील बांधणीच्या बस खासगी कंपनीकडून बांधणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या कार्यशाळेत अशा प्रकारच्या बस बांधणी होत असताना खासगी कंपनीकडून बस बांधणीसाठी निविदा प्रसिद्ध केल्यामुळे खासगीकरणाकडे एसटी महामंडळाची वेगाने वाटचाल सुरू झाल्याची चर्चा आहे.एसटी महामंडळाच्या यंत्र अभियांत्रिक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एमएस (माईल्ड स्टील) धातूमध्ये बस बॉडी बांधून रा.प. महामंडळाने पुरवठा केलेल्या चासीसवर बसविणे यासाठी ई-निविदा मागवत आहे. २७ एप्रिलपासून महामंडळाच्या संकेतस्थळावर ही निविदा उपलब्ध असेल. याबाबत अन्य माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.एसटी महामंडळाची दापोडी येथे कार्यशाळा आहे. या कार्यशाळेत एशियाडसारख्या आजही सेवेत असलेल्या बसची बांधणी होते. महामंडळ चासिस पुरविते, यावर बस बॉडी बांधण्यात येते. महामंडळाने खासगी कंपनीकडून बस बांधणी करून घेतल्यास प्रति बस सुमारे २० ते २५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चावर २८ टक्के जीएसटीदेखील आकारण्यात येईल. तथापि महामंडळाच्या कार्यशाळेत या बसची बांधणी केल्यास सुमारे १० ते १२ लाख रुपये खर्च होईल.यापूर्वी महामंडळाने साफसफाईचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. त्याचबरोबर बस धुण्याचे कंत्राटही खासगी कंपनीला दिले आहे. आता बस बांधणीचे कंत्राट खासगी कंपनीला दिल्याने महामंडळाची खासगीकरणाकडे वेगाने वाटचाल सुरू झाल्याची चर्चा महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी खासगीत मान्य करत आहेत....तर बदली होईल...खासगी कंपनीकडून बस बांधणीबाबत महामंडळाची प्रतिक्रिया जाणून घेतल्यास एकही अधिकारी ‘आॅन रेकॉर्ड’ बोलण्यास तयार नाही. तसे केल्यास बदली होईल, अशी भीती आहे. नाव न छापण्याच्या अटीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कार्यशाळेचे काम हळूहळू कमी करून कार्यशाळा बंद करण्यात येणार आहे. सध्या कार्यशाळा असलेल्या जमिनीचे भाव प्रति गुंठा ३० ते ३५ लाख रुपये आहे. ही कार्यशाळा २८ एकर इतक्या विस्तृत जागेत आहे.

टॅग्स :महाराष्ट्र