Join us

स्वच्छता अभियानाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 9, 2014 23:02 IST

आरसीएफ थळ कंपनीतील प्रगती सभागृह सकाळी ८ वाजताच खचून भरले होते. प्रथम कंपनीचे जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर यांनी सर्वांचे स्वागत करून या योजने विषयीची माहिती दिली.

अलिबाग : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व महात्मा गांधी यांचे स्वप्न साकार करण्याकरिता राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टिलायझर्सच्या (आरसीएफ) थळ प्रकल्पाचे कार्यकारी संचालक आर. के. जैन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच विविध संघटना प्रतिनिधी यांनी थळ कारखाना आवार तसेच कुरूळ येथील कारखान्याच्या सरखेल कान्होजी आंग्रे नगरीतील हॉस्पिटल येथे आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात सहभाग दिला.आरसीएफ थळ कंपनीतील प्रगती सभागृह सकाळी ८ वाजताच खचून भरले होते. प्रथम कंपनीचे जनसंपर्क अधिकारी धनंजय खामकर यांनी सर्वांचे स्वागत करून या योजने विषयीची माहिती दिली. या स्वच्छता अभियान योजनेअंतर्गत स्वच्छता शपथ ग्रहण, अधिकारी व संघटना प्रतिनिधीच्या वतीने वृक्षारोपण तसेच प्रगती सभागृह ते अग्निशमन व सुरक्षा केंद्रापर्यंत रस्त्याची सफाई असे विविध कार्यक्रम यावेळी केले. कार्यकारी संचालक आर.के. जैन, मुख्य महाव्यवस्थापक आर.जी.धात्रक, आर. पी. जावळे, महाव्यवस्थापक आर.के.वराडकर, बी. दास, उपमहाव्यवस्थापक तसेच अधिकारी संघटना, कामगार संघटना, अनुसूचित जाती जमाती संघटना, कामगार सेना असे प्रतिनिधी तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)