आरोग्य सचिव मांडणार मंत्रिमंडळासमोर प्रारूप मुंबई : पान, तंबाखू खाऊन रस्त्यावर थुंकणारे लवकरच कायद्याच्या कचाट्यात येण्याची चिन्हे आहेत. थुंकणे प्रतिबंधक कायद्याचा मसुदा येत्या काही दिवसांतच मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याची माहिती प्रधान सचिव (आरोग्य) सुजाता सौनिक यांनी ‘लोकमत’ दिली.रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे ती जागा अस्वच्छ होतेच. पण, त्याचबरोबरीने टीबीसारखा संसर्गजन्य आजारही पसरू शकतो. दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या शहरांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. १ आॅगस्टपासून सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाण्यास आणि थुंकण्यास मनाई असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण, यानंतरही काही गोष्टींच्या कमतरतेमुळे या गोष्टीचे पालन होत नाही, असे सौनिक यांनी सांगितले.अनेक ठिकाणी या गोष्टींना आळा घालणे शक्य झालेले नाही. पण, याविषयी कायदा आल्यास थुंकण्यावर आळा घालणे सहज शक्य होणार आहे. कायद्यांतर्गत कारवाई देखील करता येईल. याच दृष्टीने ‘थुंकणे प्रतिबंधक कायद्या’चा मसुदा तयार करण्यात आला असून काही दिवसांतच तो मंजुरीसाठी मंत्रिमंडळात मांडण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
थुंकण्यावर येणार बंदी !
By admin | Updated: February 3, 2015 02:23 IST