Join us

रस्त्यावर थुंकल्यास दंड आणि रुग्णसेवा करावी लागणार

By admin | Updated: June 17, 2015 03:01 IST

सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक वाहनांमध्ये थुंकणाऱ्यांना दंड तर भरावाच लागेल, पण जवळच्या रुग्णालयात जाऊन सेवाही

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी अथवा सार्वजनिक वाहनांमध्ये थुंकणाऱ्यांना दंड तर भरावाच लागेल, पण जवळच्या रुग्णालयात जाऊन सेवाही करावी लागणार आहे. महाराष्ट्र आरोग्य रक्षण व थुंकी प्रतिबंध अधिनियम २०१५ राज्यात लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या अधिनियमाची तपासणी/छाननी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या समितीमध्ये अन्न व औषधी प्रशासन मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्र्यांचा समावेश आहे. प्रस्तावित तरतुदीनुसार, सार्वजनिक ठिकाणी वा सार्वजनिक वाहनांमध्ये एकदा थुंकणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड तसेच जवळच्या रुग्णालयात एक दिवस सामाजिक सेवा, दुसऱ्यांदा वा त्यापेक्षा अधिक वेळा थुंकल्यास ३ हजार रुपये ते ५ हजार रुपये दंड आणि जवळच्या रुग्णालयात तीन दिवस सामाजिक सेवा करणे बंधनकारक असेल. तंबाखू तसेच तंबाखूयुक्त पदार्थांचे सेवन करून थुंकण्यामुळे सार्वजनिक मालमत्ता विद्रूप होतेच, शिवाय रोगराईदेखील पसरते. या पदार्थांचे सेवन न करताही थुंकीपासून अनेक रोगांचा प्रादुर्भाव होतो. या पार्श्वभूमीवर थुंकणाऱ्यांना आर्थिक आणि सामाजिक दंड देणारा कायदा येऊ घातला आहे. (विशेष प्रतिनिधी)