Join us

लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीची कासवगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:09 IST

मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना ...

मुंबई - मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची भीती व्यक्त केल्याने, महापालिकेने १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू केली. मात्र, महिनाभरात फक्त ११ मुलांचीच नोंदणी झाली आहे. यामुळे लसीच्या ट्रायलला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. यासाठी मुलांसह पालकांनीही लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पालिकेच्या नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या पाठपुराव्यानंतर 'झायडस कॅडिला' कंपनीने लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. या 'ट्रायल'मध्ये ५० मुलांना 'झायकॉडी' लस देण्यात येणार आहे. यासाठी जुलैपासून नायर रुग्णालयात नोंदणीला सुरू झाली आहे. यामध्ये मुलांना नायर रुग्णालयामध्ये येऊन नोंदणी करावी लागत आहे. या लसीकरणात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी, २८ व्या दिवशी आणि ५६ व्या दिवशी डोस दिला जाईल. मुलांची नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरणाची ट्रायल सुरू होणार आहे.

दरम्यान, नोंदणीला पाठिंबा मिळत नसल्याने लहान मुलांच्या लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावला आहे. नायर रुग्णालयात जुलैपासून लसीकरण 'ट्रायल'साठी नोंदणीला सुरुवात झाली. त्यानंतर आठवडाभरात पाच मुलांनी नोंदणी केली. त्यानंतर महिनाभरात आतापर्यंत केवळ ११ मुलांनीच नोंदणी केली आहे.

नोंदणी करण्याचे आवाहन

लहान मुलांच्या लसीकरणासाठी अनेक पालकांमध्ये गैरसमज व काळजी असल्याने, नोंदणीसाठी पालक पुढाकार घेत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मुलांची आरोग्यतपासणी तसेच मुले-पालकांच्या शंकांचे निरसन आणि समुपदेशन केल्यानंतरच नोंदणी केली जाते, असे नायरच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

मुंबईत ६ ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे २५ लाखांहून अधिक मुले आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून या सर्व मुलांचे लसीकरण लवकर होणे आवश्यक आहे. यासाठी लसीकरणासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. यासाठी 'ट्रायल' वेळेत व्हायला हवे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.