Join us

फोडाफोडीच्या हालचालींना भाजपातूनही वेग; काँग्रेसच्या नगरसेवकांना लावला गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 01:29 IST

पालिकेच्या सत्तेची चावी हाती येण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू असताना, शिवसेनेने अनपेक्षित झटका दिला. त्यामुळे भाजपानेही आता विरोधी पक्ष काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई : पालिकेच्या सत्तेची चावी हाती येण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू असताना, शिवसेनेने अनपेक्षित झटका दिला. त्यामुळे भाजपानेही आता विरोधी पक्ष काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. ही जबाबदारी आलेल्या व येणा-या नवीन पाहुण्यांवर आहे. पूर्वाश्रमीच्या काँग्रेसवासी नेत्यांचे समर्थक काँग्रेसमध्ये असल्याने, त्यांना भाजपकडे वळविण्याचे काम हे नेते करणार आहेत.फेब्रुवारी २०१७च्या पालिका निवडणुकीत संख्याबळ अपुरे पडल्याने अवघ्या दोन संख्येने भाजपाच्या हातून महापौरपद निसटले. तेव्हापासून भाजपाची मोर्चेबांधणी सुरू आहे. भांडुपची पोटनिवडणूक ही याचीच एक खेळी होती. मात्र, भाजपा हळूहळू पावले टाकत असताना, सेनेने आपले फासे टाकून आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता भाजपाने रणनीतीमध्ये थोडा बदल करीत, पक्षातील नवीन पाहुण्यांवर फोडाफोडीची कामगिरी सोपविली आहे. राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत, एनडीएत सामील होण्याची तयारी दाखविली आहे. पालिकेत काँग्रेस गटातील काही नगरसेवक राणे समर्थक आहेत, तर राजहंस सिंह यांच्या संपर्कातही काही नगरसेवक असल्याचे समजते.सेनेचे संख्याबळ वाढणार पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी १० सदस्य असून, मनसेच्या ६ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे स्थायी समितीतील शिवसेनेचे संख्याबळ ११ वर पोहोचणार आहे.असे आहे फोडाफोडीचे गणितमनसे फुटल्यानंतर काँग्रेस हा महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये बरेच गट आहेत. या गटातटाच्या राजकारणामुळेच काँग्रेसचे केवळ ३१ नगरसेवक निवडून आले. त्यात प्रभाग क्र. ११६ च्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या मृत्युमुळे ही ताकद एकने कमी झाली. यातील दहा नगरसेवकांचा एक गट फोडल्यास पक्षांतराची कारवाई टळेल.‘मामां’चे वर्चस्व वाढले : राजकारणात ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे मनसेचे माजी गटनेते दिलीप लांडे यांनी स्वतंत्र गटाद्वारे सेनेत प्रवेश केल्याने सत्ताधारी पक्षाची ताकद तसेच मामांचेही सेनेतील वजन वाढले. त्यामुळे वैधानिक समित्यांचे अध्यक्ष पद, महत्त्वाच्या पदांसाठी स्पर्धा वाढणार आहे.सत्तेसाठी रस्सीखेच : शिवसेनेकडे ८४ अधिक तीन अपक्ष व आता मनसेचे सहा असे ९४ नगरसेवक आहेत. भाजपाकडे ८२ अधिक दोन अपक्ष असे ८४ नगरसेवक आहेत. त्यात भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे तेथे पोटनिवडणूक होईल. या प्रभागात भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाचे संख्याबळ ८५ होईल. काँग्रेसचे दहा नगरसेवक फोडल्यास भाजपाकडे ९५ म्हणजे शिवसेनेपेक्षा एक नगरसेवक अधिक असेल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई