नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर गतवर्षी ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे मोठ्या नाल्यातील पाणी वस्तीत घुसले होते. पावसाळा जवळ आला असतानाही अद्याप काम पूर्ण झालेले नसून यावर्षी पुन्हा नाल्यातील पाणी शेजारच्या वस्तीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशन व जुईनगर रेल्वे स्टेशनच्या मध्ये असलेल्या नाल्यावर काम करत असताना पाणी जाण्यासाठी पाइप टाकले होते. वास्तविक डोंगरावरून येणारे पाणी या नाल्यातून खाडीकडे जाते. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे नाल्यात चॅनेल मोकळे ठेवणे आवश्यक आहे. पाइप टाकल्यामुळे पाण्याबरोबर आलेला गाळ पाइपच्या तोंडावर अडकला व सर्व पाणी येथील लक्ष्मीवाडी वस्तीमध्ये घुसले. येथील घरांचे नुकसान झाले. कंपनीची संरक्षक भिंत पडली. महामार्गावर पाणी आल्यामुळे जवळपास १० तास वाहतूक कोंडी झाली होती. वाहने पामबीच रोडवरून वळवावी लागली होती. पावसाळ्यानंतर नाल्याचे काम वेगाने होणे अपेक्षित होते. परंतु ठेकेदाराने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. पावसाळ्यापूर्वी नाल्याचे काम पूर्ण झाले नाही तर पुन्हा गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. याशिवाय काम अर्धवट असल्यामुळे अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर येथील काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
नाल्याचे काम धिम्या गतीने
By admin | Updated: May 14, 2015 01:00 IST