Join us
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमालाच्या महाराष्ट्र ब्रँडसाठी विशेष टास्क फोर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST

कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यामध्ये कृषिप्रक्रिया व मालाची विक्री, तसेच विविध कृषी ...

कृषिमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यामध्ये कृषिप्रक्रिया व मालाची विक्री, तसेच विविध कृषी योजनांच्या समन्वयासाठी कृषिप्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. तसेच कृषिमालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी विशेष टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देशही भुसे यांनी विभागाला दिले.

कृषिप्रक्रिया, कृषिमूल्यसाखळी बळकटीकरण व कृषिमालाची विक्री व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने विविध योजनांची सांगड घालण्यासाठी मंत्रालयात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण व कृषी परिवर्तन प्रकल्प, प्रधानमंत्री अन्नप्रक्रिया योजना, मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना, गटशेती योजना यासारख्या वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा समन्वयासाठी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती करण्यात येईल, असे भुसे यांनी सांगितले.

अस्तित्वात असलेल्या कृषिप्रक्रिया सुविधांचे मॅपिंग करून त्यात भर टाकण्यासाठी व उणिवा दूर करण्यासाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून द्यावे. कृषिप्रक्रिया उद्योगाबाबत कौशल्य असलेल्या तज्ज्ञांच्या सेवेचा वापर करून मूल्यसाखळी विकसित करताना समन्वय ठेवावा, असे निर्देशही कृषिमंत्र्यांनी यावेळी दिले. कृषिमालाचा महाराष्ट्र ब्रँड विकसित करण्यासाठी उत्पादननिहाय मानके निश्चित करावी. जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या तालुक्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा ही विक्री व्यवस्था बळकट करण्यासाठी वापरावी व यासाठी विशेष टास्क फोर्सची निर्मिती करावी. महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ व कृषी विद्यापीठे यांनीही या बाबींकडे विशेष लक्ष देऊन कृषिप्रक्रिया, कृषिमूल्यसाखळी बळकटीकरणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे भुसे यांनी सांगितले.

......................................