Join us

तपासासाठी पोलिसांची विशेष पथके

By admin | Updated: April 6, 2015 04:58 IST

घडलेल्या गुन्ह्याचा तपास नियोजनबध्द व्हावा, तसेच एकाच गुन्ह्यांच्या तपासात सर्वच अधिकारी गुंतू नयेत यावर पोलिसांनी उपाय काढला आहे.

नवी मुंबई : घडलेल्या गुन्ह्याचा तपास नियोजनबध्द व्हावा, तसेच एकाच गुन्ह्यांच्या तपासात सर्वच अधिकारी गुंतू नयेत यावर पोलिसांनी उपाय काढला आहे. गुन्ह्यांच्या वर्गवारीनुसार विशेष पथके तयार करून त्यांच्यावर गुन्ह्यांच्या तपासाचा भार देण्यात आला आहे.शहरातील गुन्हेगारी नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रकारच्या शक्कल लढवल्या जात आहेत. मात्र अनेकदा एकाच गुन्ह्यांच्या तपासात अनेक अधिकारी गुंतून इतर गुन्ह्यांच्या तपासावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास नियोजनबध्द व्हावा याकरिता दहा पथके तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकाकडे वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारी देण्यात आल्याचे परिमंडळ १ चे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. त्यामध्ये मोबाइल चोरी, लॅपटॉप चोरी, सोनसाखळी चोरी, वाहन चोरी, घरफोडी व दरोडा अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. परिमंडळमध्ये असे गुन्हे घडल्यास त्याचा संपूर्ण तपास सबंध पथक करणार आहे. त्याकरिता प्रत्येक पथकात एक अधिकारी व चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. गुन्ह्यांचा तपास करण्याची असलेली आवड आणि प्रावीण्य जाणून इच्छेनुसार अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात एकाच गुन्ह्यांच्या तपासात इतर अधिकारी गुंतून राहणार नाहीत. (प्रतिनिधी)