Join us

स्लोव्हिनियाचे विशेष वाहन अग्निशमन दलाच्या ताफ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 03:01 IST

उत्तुंग इमारतींपुढे शिड्यांची उंची तोकडी पडली, तरी जिवाची बाजी लावत नागरिकांचे प्राण वाचविणारे मुंबई अग्निशमन दल अधिक मजबूत होणार आहे.

मुंबई : उत्तुंग इमारतींपुढे शिड्यांची उंची तोकडी पडली, तरी जिवाची बाजी लावत नागरिकांचे प्राण वाचविणारे मुंबई अग्निशमन दल अधिक मजबूत होणार आहे. ज्वलनशील रसायनांमुळे लागलेली आग, किरणोत्सर्ग, विषारी, स्फोटक अशा आपत्तींमध्ये प्रभावी मदत कार्यासाठी, स्लोव्हिनिया येथून विशेष वाहन अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहे.दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात आगीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या तुलनेत मुंबई अग्निशमन दलाचा ताफा मर्यादित आहे, तर औद्योगिक वसाहती, तेल कंपन्यांमध्ये लागणाऱ्या आगींनी धोका वाढविला आहे. रसायनिक व स्फोटकांच्या आगींमध्ये मदतकार्य करण्यात अनेक अडथळा येतात. २६ नोव्हेंबर, २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्यात आली.त्याप्रमाणे, अग्निशमन दलातही अद्ययावत यंत्रणा आणण्यात आली. या वेळेस किरणोत्सर्ग आणि रसायनिक हल्ल्यांचा सामना करण्यासाठी विशेष वाहन अग्निशमन दलाच्या तफ्यात दाखल होणार आहे. अशा प्रकारचे हे पहिलेच वाहन आहे. आठ कोटी रुपये या वाहनाची किंमत असून, यामध्ये प्रशिक्षण आणि देखभाल खर्चाचा समावेश आहे. अग्निशमन दलातील दोन अधिकाºयांना हे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.