अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
मुक्काम पोस्ट
महामुंबई
लोकसभा निवडणुकीच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी मोदीजींचे हात बळकट करायचे असे सांगत तर विरोधकांनी भाजपला पराभूत करायचे आहे, असे म्हणत आपापल्या कार्यकर्त्यांना कामाला लावले. विधानसभेच्या वेळी, जो चांगले काम करेल त्याचाच विचार महापालिकेच्या निवडणुकीत केला जाईल, असे धमकीचे गाजर याच कार्यकर्त्यांपुढे लटकवले गेले. आता जेव्हा प्रत्यक्षात महापालिका निवडणुका तोंडावर आल्या, तेव्हा मागच्या दोन्ही निवडणुकींत कष्ट करणारे कार्यकर्ते याच नेत्यांना अडचणीचे वाटू लागले आहेत. आम्ही तुमच्यासाठी फक्त सतरंज्याच उचलायचा का?, असा सवाल करणारे कार्यकर्ते नेत्यांना आवडेनासे झाले आहेत. सर्व्हेमध्ये तुमचे नाव आले, तर शंभर टक्के तुम्हाला तिकीट देऊ, असे नवे गाजर कार्यकर्त्यांना दिले जात आहे. नेत्याची बायको, मुलगा, मुलगी, सून यांची नावे कुठल्या सर्व्हेमध्ये येतात? म्हणून त्यांना तिकिटे दिली जातात... असा संतप्त सवाल सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यातही सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’, या पातळीवरची आहे.
त्यात पार पडलेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत बदलापूरचे शिंदेसेनेचे नेते वामन म्हात्रे यांनी त्यांच्या घरातल्या सहा जणांना, प्रवीण राऊत यांनी स्वतःसह घरातल्या दोघांना, तर अंबरनाथचे शिंदेसेनेचे अरविंद वाळेकर यांनी घरातल्या तिघांना उमेदवारी देऊ केल्या. तर, बदलापूर भाजपचे रमेश सोळशे आणि हर्षदा सोळशे या दोघांनी स्वतःसाठी तिकिटे मिळवली. काँग्रेस तरी कशी मागे राहील? काँग्रेसचे प्रदीप पाटील यांनी स्वतःसह घरातल्या अन्य तिघांना, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील यांनी स्वतःसह घरातल्या दोघांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते.
कधी काळी काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणारे सर्वच पक्ष आता आधी मी, नंतर माझे कुटुंब आणि जागा उरल्या तर बाकीचे... या भूमिकेतून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या चार जिल्ह्यांत नऊ महानगरपालिका आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ही निवडणुका तोंडावर आहेत. त्यासाठी आतापासूनच सर्वपक्षीय नेते आपापल्या कुटुंबातल्या सदस्यांना तिकीट मिळावे, म्हणून फिल्डिंग लावून तयार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी वॉर्डनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. ज्या ठिकाणी पुरुष नगरसेवकांचे वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले, त्या वॉर्डांमध्ये अचानक अशा माजी नगरसेवकांच्या पत्नी, बहीण, मुलगा यांचे फोटो होर्डिंगवर झळकू लागले आहेत. त्यामुळे त्या वॉर्डात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सतरंज्या टाकण्याचे काम करायचे का?, याचे उत्तर कोणीही द्यायला तयार नाही.
आरक्षणाचा अनेक माजी नगरसेवकांना फटका बसला आहे. त्यामुळे त्यांनी कुटुंबातील व्यक्तीसाठी स्व पक्षाकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. उद्धवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी मुलगा पवन व स्वतःसाठी, आ. अजय चौधरी यांनी सून गौरीसाठी, माजी आ. दगडू सकपाळ यांनी मुलगी रेश्मासाठी, आ. मनोज जामसुतकर यांनी पत्नी सोनमसाठी, माजी आ. रमेश कोरगावकर यांनी पत्नीला उमेदवारी मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर यांनी पत्नी श्रद्धा, अनिष मकवानी यांनी पत्नी प्रीती, पंकज यादव यांनी पत्नी ममता, अभिजीत सामंत यांनी पत्नी अंजली यांना निवडणुकीत उतरविण्याचे ठरविले आहे. शिंदेसेनेचे माजी खा. राहुल शेवाळे यांनी पत्नी कामिनी व वहिनी वैशाली, आ. तुकाराम काते यांनी सून समृद्धी, आ. मुरजी पटेल यांनी पत्नी केशरीबेन, माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांनी मुलगी वृषाली, आत्माराम चाचे यांची सून रिशीता, स्वप्निल टेंबलकर यांनी पत्नी वर्षा यांच्यासाठी तर, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुलगी सृष्टीसाठी शिवडीतील सुरक्षित प्रभागाची मागणी केल्याचे त्या-त्या भागातील दुःखी कार्यकर्ते सांगत आहेत. मुंबईमध्ये जवळपास ३४ वार्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी तिथल्या माजी नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना तिकीट हवे आहे.
ठाण्यातही फार वेगळे चित्र नाही. २०१७ मध्ये शिंदेसेनेचे देवराम भोईर नगरसेवक होते. त्यांची दोन्ही मुले संजय आणि भूषण यांच्यासह संजयची पत्नी उषा यांनाही त्यांनी तिकीट मिळवून दिले होते व ते निवडूनही आले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती व्हावी, असे त्यांना वाटते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक, मुलगा पूर्वेश सरनाईक मंत्री महोदयांचा पीए संदीप डोंगरे यांची पत्नी आशा डोंगरे २०१७ मध्ये निवडून आले होते. त्यामुळे त्यांचा आता क्लेम कायम आहे. कळव्यात राष्ट्रवादीचे मुकुंद केणी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला केणी निवडून आले होते. कोरोना काळात मुकुंद केणी यांचे निधन झाले. आता त्यांच्या पत्नी आणि मुलगा मंदार यांनी शिंदेसेनेत प्रवेश
केला असून, मुकुंद यांच्या जागी त्यांचा मुलगा मंदार निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. एकनाथ भोईर, एकता भोईर या पती-पत्नींना शिंदेसेनेतून,
तसेच राजन किणे, अनिता किणे या
पती-पत्नीनाही आता शिंदेसेनेच्या पाठबळावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवायची इच्छा आहे. कृष्णा पाटील, नंदा पाटील या पती-पत्नींना व त्यांचे बंधू सचिन पाटील या तिघांनाही भाजपकडून उमेदवारी हवी आहे.
ही काही मोजकी उदाहरणे आहेत. महामुंबईच्या नऊ महानगरपालिकांमध्ये थोड्याफार फरकाने नात्यागोत्याचे राजकारण सुरू आहे. लोकसभा विधानसभेसाठी कष्ट करणारे कार्यकर्ते आता नात्यागोत्यासाठी कष्ट करतील. शेवटी कार्यकर्ता भाजीतल्या कढीपत्त्यासारखा असतो. भाजी करताना फोडणीत सगळ्यात आधी कढीपत्ता टाकला जातो आणि जेवायला सुरुवात करताना भाजीतून सगळ्यात आधी कढीपत्ताच बाजूला काढला जातो.
बिच्चारे कार्यकर्ते...
Web Summary : Municipal elections prioritize family over dedicated party workers. Leaders favor relatives for tickets, leaving loyalists feeling used and discarded like curry leaves after adding flavor. Nepotism dominates across parties.
Web Summary : नगर पालिका चुनावों में समर्पित पार्टी कार्यकर्ताओं पर परिवार को प्राथमिकता दी जाती है। नेता टिकटों के लिए रिश्तेदारों का पक्ष लेते हैं, जिससे वफादार कार्यकर्ता इस्तेमाल के बाद करी पत्ते की तरह बेकार महसूस करते हैं। भाई-भतीजावाद दलों में हावी है।