Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?

By अतुल कुलकर्णी | Updated: December 7, 2025 07:29 IST

सर्व पक्षीय नेत्यांची परवा एक मीटिंग झाली. सगळ्यात बेस्ट भांडण कोणाचे झाले, त्यासाठी पुरस्कार द्यायचा झाला तर कोणाची निवड करावी यावर चर्चा झाली. सर्वानुमते “बेस्ट भांडण ऑफ नगरपालिका निवडणूक” असा पुरस्कार नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांना देण्यावर एकमत झाले.

अतुल कुलकर्णी

संपादक, मुंबई

रामराम मंडळी,

कसे आहात... तुम्हा सगळ्यांना राजकारण्यांनी कसे मस्त उल्लू बनवले..! तुम्ही आपले बसलात भांडत... एकमेकांच्या अंगावर धावून काय गेलात, एकमेकांना शिवीगाळ काय केली... कपडे काय फाडले... अरे अरे अरे... तुम्हाला नेत्यांसारखे भांडता येत नाही हेच शेवटी खरे निघाले..! म्हणून तर  ते राजकारणात आहेत. भलेभले नट त्यांच्यासारखे भांडण करू शकणार नाहीत. नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्यातल्या अनेक नेत्यांनी बेस्ट परफॉर्मन्स दिला. सत्ताधारी गटात राहून एकमेकांशी त्यांनी जोरदार भांडण करून दाखवले. एकमेकांना मारझोड करून दाखवली. त्यामुळे त्यांच्या ॲक्टिंगच्या परफॉर्मन्सला फिल्मफेअर नक्कीच मिळेल..! जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीत ही सगळी मंडळी ॲक्टिंगचे असे काही जलवे दाखवतील की, त्यांना ऑस्कर नक्कीच मिळेल त्याविषयी आमच्या मनात शंका नाही. गरज फक्त तुम्ही उल्लू बनण्याची आहे... तसे तुम्ही नेहमीच उल्लू बनत आलात... म्हणून तर त्यांच्या ॲक्टिंगला एवढा भाव मिळाला. तुम्ही फसला नसता तर त्यांची अडचण झाली असती...

इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या

सर्व पक्षीय नेत्यांची परवा एक मीटिंग झाली. सगळ्यात बेस्ट भांडण कोणाचे झाले, त्यासाठी पुरस्कार द्यायचा झाला तर कोणाची निवड करावी यावर चर्चा झाली. सर्वानुमते “बेस्ट भांडण ऑफ नगरपालिका निवडणूक” असा पुरस्कार नीलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांना देण्यावर एकमत झाले. दुसरा पुरस्कार सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांना विभागून द्यावा अशीही त्यांची चर्चा झाली. सत्तेत असूनही तेच एकमेकांशी इतके भांडत राहिले की माध्यमांचे सगळे लक्ष फक्त त्यांच्याकडेच राहिले. उद्धव-राज एकत्र येऊनही काहीच साध्य करू शकले नाहीत. त्याचे मुख्य कारण सत्ताधारीच आपापसात भांडत राहिले हेच आहे. विचार करा, हे जर आपापसात भांडले नसते तर माध्यमांना एवढ्या बातम्या कुठून मिळाल्या असत्या..? विरोधकांनी रस्ते, पाणी, वीज, खड्डे असे विषय काढले असते. माध्यमांनी तेच छापले असते. राज्यभर रस्ते का उखडले? शाळांमध्ये अनेक गैरसोयी का आहेत? आरोग्य सुविधेच्या नावाने ठणठणाट का? या प्रश्नांची उत्तरे विरोधकांनी विचारली असती तर... महागाई, बेरोजगारी असे विषय विरोधकांनी काढले असते तर... या गोष्टींची उत्तरे कोणत्या सत्ताधारी नेत्याला द्यावी वाटतात? त्यापेक्षा ते त्यांच्यात भांडत बसले. मीडियाची सगळी स्पेस त्यांनीच व्यापून टाकली. त्याचे अनेक फायदे झाले. महाराष्ट्रात विरोधक आहेत की नाही हे लोकांना कळालेच नाही. राज आणि उद्धव दोघे एकमेकांना भेटण्यात व्यस्त राहिले आणि सत्ताधारी एकमेकांशी भांडण्यात मस्त राहिले. काँग्रेस पक्ष गांधीजींचा विचार सांगत राहिली. शरद पवार मुरलेले राजकारणी असल्यामुळे, कोणी कोणासोबत जावे हा निर्णय स्थानिक पातळीवर नेत्यांनीच घ्यावा असे त्यांनी सांगून टाकले...

त्यांच्या भांडणामुळे किती गोष्टी साध्य झाल्या बघा... सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही देखील घरचे भांडण असल्यासारखे त्यांचे भांडण बघत बसलात... एकाच घरात राहणारे दोन भाऊ नीलेश आणि नीतेश... एकत्र जेवण करायचे आणि बाहेर पडून एकमेकांच्या विरोधात भांडायचे... नवनीत कौर राणा भाजपच्या. त्यांच्या पतींचा; रवी राणांचा पक्ष वेगळा. दोघे घरून एकत्र जेवण करून निघायचे. प्रचार मात्र एकमेकांच्या विरोधात करायचे. ‘आम्ही दोघे घरी नवरा-बायको आहोत. बाहेर मी भाजपची आहे त्यांचा पक्ष वेगळा आहे’ असे नवनीत राणा यांनी जाहीरपणे सांगितले... त्यांच्या या ॲक्टिंगला तुम्ही खरे तर दाद दिली पाहिजे. उगाच त्यांच्यावर टीका करत राहता... ते एकमेकांशी असे भांडल्याचे फायदे-तोटे २१ तारखेला निकाल लागल्यावर दिसून येतीलच... आपल्या पूर्वजांनी “भांडा, सौख्यभरे” असे उगाच नाही सांगितले... तेव्हा उगाच त्यांच्यावर टीका करत बसू नका. त्यांच्यासारखे भांडण्याचा प्रयत्न तर करून बघा... यश नक्की मिळेल...

                तुमचाच, बाबूराव

टॅग्स :राजकारणरविंद्र चव्हाणनिलेश राणे