मुंबई : राज्याच्या सुरक्षिततेसाठी मनुष्यबळाच्या वाढीबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होणे आवश्यक आहे. त्यात बदलत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांपुढे अनेक आव्हाने आहेत. त्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेसाठी ‘महिला सुरक्षा गस्त पथक’ सज्ज करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सोमवारी मरिन ड्राइव्ह येथील पोलीस जिमखाना मैदानात विशेष व्हॅन्सचे लोकार्पण करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना अमलात आणण्यात येतात. शहरात महिलांना अधिक सुरक्षित वाटावे, यासाठी महिला सुरक्षा गस्त पथक आता तैनात असणार आहेत. ही पथके मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष, महिला तक्रार नियंत्रण कक्ष, महिला हेल्पलाइन आणि व्हॉट्सअॅप क्रमांकाशी वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून कनेक्ट असणार आहेत. महिलांसाठी गस्त घालणाऱ्या या व्हॅनमध्ये महिला पोलीस कर्मचारी तैनात असतील. नियंत्रण कक्षातून एखादा महिला अत्याचाराचा कॉल आल्यास हे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल होणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मोबाइल-५’ या नावाने या गाड्या कार्यान्वित राहणार आहेत. या वाहनांचा लोकार्पण सोहळा सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील पोलीस जिमखान्यात झाला. या वेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, प्रधान सचिव विजयकुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत महिला आणि बालकांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक आहे. महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी गुन्ह्यांची नोंद होण्याबरोबरच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या सुरक्षा गस्त पथकांमुळे समाजातील गुन्हेगारीस चाप बसण्यास मदत होणार आहे. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी ही पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विशेष पोलीस व्हॅन्सचे लोकार्पण
By admin | Updated: November 24, 2015 02:08 IST