Join us

महिलांसाठी विशेष बस, रेल्वेची सुविधा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 01:56 IST

मंदाताई म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवी मुंबई : चार महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये घरी अडकून पडलेल्या नोकरदार महिला पुन्हा सेवेत रुजू होऊ लागल्या आहेत. प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने त्यांची दमछाक होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई ते मुंबईदरम्यान, महिलांसाठी विशेष बस आणि रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे.

मंदा म्हात्रे यांनी या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसला आहे. कोरोनामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे, परंतु आता बिगेन अगेनअंतर्गत खासगी आणि शासकीय कार्यालयातील नोकरदार महिला मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागल्या आहेत. मध्यमवर्गीय नोकरदार महिलांना आॅटो किंवा टॅक्सी हा पर्याय परवडणारा नाही. त्यांना प्रवासी बस हाच एक पर्याय जवळचा वाटतो. बस डेपोमधून बसेस नेहमी भरून येत असल्याने टप्प्याटप्प्यावरील बस थांब्यांवर बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या अनेक महिलांना बसमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे या महिलांना दीड ते दोन तास बसची वाट पाहावी लागते. विशेष म्हणजे, बस थांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाही. लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत, परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाºया शासकीय कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एकूणच नोकरदार महिलांना या प्रक्रियेत कमालीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्यासाठी नवी मुंबई ते मुंबईदरम्यान, बस किंवा रेल्वेची विशेष सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.