Join us  

फिल्म इंडस्ट्रीला ‘ड्रग्ज’चा ओव्हरडोस

By मनीषा म्हात्रे | Published: May 28, 2023 7:42 AM

आर्यन याला काॅर्डिलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणात अटक करून खळबळ उडवून देणारे एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे.

बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन याला काॅर्डिलिया क्रुझ ड्रग्जप्रकरणात अटक करून खळबळ उडवून देणारे एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना हे प्रकरण चांगलेच भोवले आहे. एनसीबीने आर्यन खान याच्यासह सहा जणांना सबळ पुराव्यांअभावी आधीच निर्दोष सोडले आहे. तर, एनसीबीच्या अहवालावरून सीबीआयने वानखेडे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवत, तपास सुरू केला आहे. येत्या काळात यामागचे सत्य समोर येईल, पण या निमित्ताने ग्लॅमरस बॉलिवूडमधील ड्रग्जच्या विश्वाची चर्चा सुरू झाली आहे.

ड्रग्ज प्रकरणाशी अनेक कलाकारांची नावे जोडली. बॉलिवूड आणि ड्रग्ज माफिया यांचा जवळचा संबंध आहे. अनेकजण लहानपणापासून ड्रग्ज घेतात आणि मोठेपणी अभिनेते, दिग्दर्शक बनतात. या अभिनेत्यांपैकी एकासोबत मी डेटवर जात असल्याचा खुलासा अभिनेत्री कंगना राणौतने केला होता. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक किस्से बाहेर आले. 

संजय दत्तलाही ड्रग्जचे व्यसन होते, पण तो आता यातून पूर्णपणे बाहेर आला आहे. फरदीन खानलाही चित्रपटात काम करत असताना ड्रग्जचे व्यसन लागले होते. या व्यसनामुळे मुंबई पोलिसांनी २००१ मध्ये त्याला अटकही केली होती. यानंतर त्याने निर्व्यसनीकरणाची वाट धरली. प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा कोईराला ड्रग्ज आणि मद्याच्या आहारी गेली. कॅन्सर झाल्यानंतर तिने या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर पुन्हा चिखलफेक झाली.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला एनसीबीने अटक केली होती. एनसीबीने पुढे तपास करत अभिनेत्री दीपिका पादुकोन हिच्यासह अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा यांच्याकडे कसून चौकशी केली. क्वॉन कंपनीची टॅलेंट मॅनेजर जया शाह आणि ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी यांच्या चौकशीत श्रद्धा आणि सारा यांच्यासह अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांची नावे समोर आली होती. एनसीबीने करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शनचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर क्षितिज प्रसाद आणि सहायक दिग्दर्शक अनुभव चोपडा यांच्याकडे चौकशी केली. पुढे प्रसाद यांना चौकशीअंती अटक केली. एनसीबीने बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्या घरी छापेमारी करत ड्रग्ज ताब्यात घेतले होते.

डिप्रेशन आणि ड्रग्जकाम न मिळाल्याने येणारे ‘डिप्रेशन’ आणि त्यातूनच व्यसनाधीनता वाढीस लागते. काम मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये पार्ट्या आणि ड्रग्ज सेवन हादेखील सवयीचा भाग बनल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

...म्हणून मुंबईबाहेर रेव्ह पार्ट्यामुंबईत तपास यंत्रणांचे विशेष लक्ष असल्याने अनेकदा मुंबईबाहेर कलाकारांच्या रेव्ह पार्ट्या रंगताना दिसतात. यामध्ये नाशिक, अलिबाग, गोव्यासह विविध ठिकाणांची भर पडत आहे. ‘बिग बॉस’मधून करिअरच्या वाटेवर स्वार झालेली अभिनेत्री हिना पांचाल ही २०२१ मध्ये इगतपुरी येथील एका बंगल्यात ड्रग्जच्या पार्टीत आढळली.  तिच्यासोबत कोरिओग्राफर, कॅमेरामन, मेकअपमॅन असे २२ जण होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

अनेक सेलिब्रिटींची चुकीची धारणा आहे की, गांजा सेवनामुळे कार्यक्षमता वाढते. काम चांगले होते. जवळचे मित्रमैत्रिणी कमी असतात, त्यामुळे मनातल्या गोष्टी शेअर करणे शक्य होत नाही. भावना दाबून ठेवाव्या लागतात. शिवाय, फियर प्रेशरही खूप असल्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने फिल्म इंडस्ट्री ड्रग्जला आपलेसे करताना दिसत आहे. मात्र हे घातक असून यातून वेळीच बाहेर पडणे गरजेचे आहे.- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ 

टॅग्स :बॉलिवूडआर्यन खानसमीर वानखेडे