Join us  

बापट, तुम्ही गेलात... आमच्यासाठी एक जागा रिकामी झाली..!

By अतुल कुलकर्णी | Published: April 02, 2023 11:24 AM

उगाच तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या रिकाम्या झालेल्या जागेवर कोण उभे राहणार, याची चर्चा करणाऱ्यांना दोष देऊ नका.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

प्रिय गिरीश बापट, नमस्कार

तुम्ही असे अचानक जाल, असे वाटले नाही. पुण्यातल्या पोटनिवडणुकीत आपण नाकाला नळी लावलेल्या अवस्थेत प्रचारासाठी आलात. खचलेल्या आवाजात भाषण केलेत. त्यावेळी मनात थोडी गलबल झाली. आपल्याला असे पाहायची सवय नव्हती. त्यावेळी अनेकांचे डोळे भरून आले. अशा अवस्थेत प्रचाराला आणायची गरज होती का..? असे प्रश्नही उपस्थित केले गेले; मात्र आपण आपल्याच पक्षाचे घोषवाक्य खरे करून दाखविले. ‘आधी देश, नंतर पक्ष, शेवटी मी...’ या पक्षादेशाला आपण जागलात; पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. आपण हे जग सोडून गेलात. आपल्या जाण्याला तीन दिवस होण्याआधीच, म्हणजे आपल्या अस्थी थंड होण्याआधीच तुमच्या जागी कोणाला उभे करायचे..? याचा निर्णय आम्हाला तत्काळ घ्यायचा आहे.

राजकारणात काळ-वेळ पाहून बोलण्याचे दिवस गेले... आता प्रत्येक क्षण शेवटचा क्षण समजून काम करावे लागते. १४ दिवस झाल्यावर तरी चर्चा करावीच लागेल ना. मग ती आताच केलेली काय वाईट...? हा व्यवहारी विचार आहे, असे आपल्याला वाटत नाही का...? उगाच तुम्ही फार वाईट वाटून घेऊ नका. तुमच्या रिकाम्या झालेल्या जागेवर कोण उभे राहणार, याची चर्चा करणाऱ्यांना दोष देऊ नका.

तुमचे निधन झाले त्या दिवशी, तुमच्या पार्थिवावर संध्याकाळी सहाच्या सुमारास अंत्यसंस्कार झाले. त्याआधी दोन तास म्हणजे दुपारी चार वाजता, भाजपचे भावी खासदार म्हणून जगदीश मुळीक यांचे होर्डिंग पुण्यात लागले. कार्यकर्त्यांनी मुळीक यांना भावी खासदार म्हणून बोलावले तर बिघडले कुठे..? उगाच मुळीकांना बदनाम केले गेले. काहीजण म्हणतात, मुळीकांच्या विरोधात मुद्दाम भाजपच्या काही नेत्यांनी तशी होर्डिंग लावली. एखादा नेता गेल्यावर त्याच्या जाण्याचे राजकारण करणे हे महाराष्ट्राला नवीन आहे का, बापट साहेब..? त्यातल्या त्यात काँग्रेसचे विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्या संयमाचे तुम्ही कौतुक केले पाहिजे. भाजप नेत्यांसारखे त्यांनी तुमच्या निधनानंतर काही तासांतच भावी खासदार असे होर्डिंग लावले नाहीत. तब्बल तीन दिवसांनंतर ते म्हणाले, तुमच्यामुळे रिकामी झालेली जागा काँग्रेस लढवेल. तीन दिवसांच्या या संयमाची कौतुकाने दखल घेतली पाहिजे. आता पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांना उमेदवारी द्या, अशी सूचना केली तर बिघडले कुठे..? ज्या कार्यकर्त्यांमुळे आपण अडचणीत येऊ शकतो, असे कार्यकर्ते तुम्ही वेचून वेचून बाजूला ठेवले होते; मात्र त्यातल्याच काहींनी आपल्या सूनबाई स्वरदा बापट यांचे नाव पुढे करणे सुरू केले आहे. ज्या मुक्ताताई टिळक आजारी असतानाही ॲम्ब्युलन्समधून विधानभवनात मतदानाला आल्या, त्यांचे पती शैलेश टिळक यांना भाजपने खासदारकीची उमेदवारी दिली पाहिजे, अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. या अशा चर्चा होण्याला विरोध असायचे काहीच कारण नाही; मात्र उगाच तुम्हाला जाऊन तीन दिवसही झाले नाहीत, तेव्हा अशा चर्चा का सुरू केल्या? असे म्हणून नेते, कार्यकर्त्यांवरच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभे करणे बरोबर आहे का बापट साहेब...?

तुमचा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला होता की नाही माहिती नाही; मात्र तो तुमचा स्वतःचा बालेकिल्ला होता. ज्याच्या भोवती तुम्ही सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांची मजबूत तटबंदी उभी केली होती. अनेकांना ती दिसलीच नाही. त्यासाठी त्यांना दोष देऊ नका. तुम्ही जे केले ते आता तुमच्या जागेवर डोळा ठेवणाऱ्यांना कधीही जमणार नाही. एक मुस्लीम मतदार हज यात्रेला जाण्याच्या आधी तुम्हाला भेटायला आला होता. त्याला तुम्ही आर्थिक मदत केली. एवढेच नव्हे, तर हज यात्रेवरून येताना माझ्यासाठी तिथले पवित्र पाणी आण,  असे सांगितले. त्या मतदाराने तुमच्यासाठी प्रेमाने हजहून पवित्र पाणी आणले. ते तुम्ही आणि वहिनींनी अत्यंत प्रेमाने प्राशन केले. हे करायला फार मोठे मन लागते. जे तुमच्याकडे होते; पण आता तसेच मन प्रत्येक नेत्याकडे, कार्यकर्त्याकडे असेल अशी अपेक्षा करू नका. दिवसेंदिवस जग व्यवहारी होत चालले आहे. अजित पवारांनी ‘जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा’, असे विधान केले; मात्र ते ऐकून त्यावर विचार करण्याची मानसिकता किती नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये उरली आहे..? तुम्ही गेलात म्हणून राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, काँग्रेसचे उल्हासदादा घरचे कुणी गेल्यासारखे ढसाढसा रडले. तुम्ही भाजपचे होतात म्हणून नाही... तर तुम्ही त्यांच्या प्रेमाचे होतात म्हणून... पण, या गोष्टी बोलायला, ऐकायला आम्हाला वेळ नाही. आता आम्हाला तुमच्या जागी कोणाला उभे करायचे...? त्यासाठी काय तयारी करायची...? याच्या कामाला लागायचे आहे. तेव्हा तुमच्या आत्म्याला शांती मिळो, असे म्हणायलाही आमच्याकडे वेळ नाही. तुम्ही गेलात, पुण्यात तुम्ही तुमच्या प्रेमाच्या माणसांची फळी उभी केलीत. ज्यांना काहीही मिळवायचे नाही, असे काही वेडे लोक तुमचे प्रेम लक्षात ठेवतील... आम्ही वेडे नाहीत. आम्हाला व्यवहार कळतो. त्यामुळे उगाच आमच्याकडून फार अपेक्षा ठेवू नका...  हे सांगण्यासाठी हे पत्र लिहिले.- तुमचाच, बाबूराव

टॅग्स :गिरीश बापटपुणे