Join us  

दक्षिण मध्य मुंबईचा वीजपुरवठा खंडित; परळ, शिवडी, भायखळावासी घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 6:03 AM

बेस्टला वीज पुरविणाऱ्या टाटा पॉवरच्या यंत्रणेत बिघाड

मुंबई : टाटा पॉवरच्या परळ येथील रीसिव्हिंग स्टेशनमध्ये झालेल्या बिघाडामुळे दक्षिण मध्य मुंबईतील बेस्टच्या वीजग्राहकांचावीजपुरवठा खंडित झाला होता. रविवारी सकाळी पावणे अकरा ते दुपारी पावणे एकदरम्यान वीजपुरवठ्यातील अडथळ्यामुळे बेस्टचे ग्राहक गरमीने घामाघूम झाले होते.बेस्ट प्रशासनाकडून मुंबई शहरात वीजपुरवठा केला जातो, तर बेस्टला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा केला जातो. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास टाटा पॉवरच्या परळ येथील रीसिव्हिंग स्टेशनमध्ये बिघाड झाला. परिणामी, रीसिव्हिंग स्टेशनमध्ये यंत्रणा बंद पडली. त्यामुळे परळ, शिवडी, भायखळा, माटुंगा, माहिम, सायन, मुंबई सेंट्रल, लालबाग, महालक्ष्मी, वरळी, हाजीअली, मलबार हिल, कंबाला हिल परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. आधीच उकाडा त्यात बत्तीगुल झाल्याने बेस्टच्या वीजग्राहकांमध्ये संताप होता.टाटा पॉवरने दिलेल्या माहितीनुसार, परळ येथील रीसिव्हिंग स्टेशनमध्ये झालेल्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. तातडीने यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. यंत्रणेतील बिघाड नेमका का झाला, याबाबतचा तपास करण्यात येणार असून, ग्राहकांनी २४ तास अखंडित वीजपुरवठा देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.तीन महिन्यांतील दुसरा बिघाडटाटा पॉवरकडून बेस्टला वीजपुरवठा केला जातो. त्यानंतर बेस्ट शहरातील आपल्या वीज ग्राहकांना वीज देते. वीजपुरवठा खंडित होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी तीन महिन्यांपूर्वीही टाटा पॉवरच्या केंद्रात झालेल्या बिघाडामुळे दक्षिण मध्य मुंबईतील विशेषत: महालक्ष्मी आणि वरळी येथील वीज ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला होता. तेव्हा रात्रीच्या वेळी वीज खंडित झाली होती. तब्बल तासाभराने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता.मुंबई शहर, उपनगराला चार कंपन्यांकडून पुरवठामुंबई शहर आणि उपनगरात एकूण चार वीज कंपन्या वीजपुरवठा करतात. मुंबई शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरात टाटा, अदानी आणि महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. मुलुंड आणि भांडुप येथेमहावितरण वीजपुरवठा करते, तर उर्वरित ठिकाणी अदानी आणि टाटा वीजपुरवठा करते. मुंबई शहरात टाटाकडून कमी वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो; मात्र हे प्रमाण कमी आहे. स्वस्त विजेचा विचार करता बेस्टची वीज स्वस्त आहे. त्यानंतर टाटा, अदानी आणि महावितरणचा क्रमांक लागतो.

टॅग्स :वीज