Join us  

पूर्व द्रुतगती महामार्गावरील दक्षिण बाऊंड उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2020 2:39 PM

Mumbai : या जंक्शनवरील गर्दी कमी करण्यासाठी तसेच मुंबई व घाटकोपरकडे जाणारी वाहतूक वेगळी करण्यासाठी १२ मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल प्रस्तावीत करण्यात आला होता.

मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील अंधेरी-घाटकोपर जंक्शनवर नव्याने बांधण्यात आलेल्या दक्षिण बाऊंड उड्डाणपुलाचे उद्घाटन आज सोमवारी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि संसद सदस्य, आमदार, नगरसेवक, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या जंक्शनवरील गर्दी कमी करण्यासाठी तसेच मुंबई व घाटकोपरकडे जाणारी वाहतूक वेगळी करण्यासाठी १२ मीटर रुंदीचा हा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला होता.

 मुंबईहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना तीन लेन उड्डाणपूल होता, तथापि, त्यांना अंधेरी-घाटकोपर जंक्शनवर मोठ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे वाहतुकीची ही कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने (मुंबईच्या दिशेने) तीन लेन नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले. आता नव्याने तयार केलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी आजपासून खुला झाल्याने आता प्रवाशांना दोन्ही दिशेने सुरळीत व सुरक्षित वाहतुकीचा अनुभव घेता येईल. यामुळे ठाण्याहून मुंबईला जाण्यासाठी चांगली कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

 उड्डाणपुलाचे काम मेसर्स एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.  लि. आणि मेसर्स काशेक इंजिनिअर्स प्रा. लि. यांना देण्यात आले होते. निविदेची किंमत ही ३३.०४ कोटी रुपये होती.  उड्डाणपुलाची एकूण रुंदी १२ मीटर आणि लांबी ६९३ मीटर आहे. उड्डाणपुलाच्या सुपरस्ट्रक्चरमध्ये स्टील गर्डर, आरसीसी स्लॅब आणि पीएससी - १ गर्डरचा टिपिकल स्पॅन आरसीसी डेकस्लॅब ऑब्लिगेटरी स्पॅनशी एकत्रित आहे.  एमएमआरडीएच्या माहितीनुसार या प्रकल्पातून कुशल कामगारांसाठी एकूण ३० हजार ०३६ मनुष्यदिवस तर अकुशल कामगारांसाठी ३६ हजार ८७५ मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली.  या प्रकल्पातून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनावर सुमारे १२.८ कोटी रुपये खर्च झाले.

 एमएमआरडीएचे महानगर आयुक्त  आर. ए. राजीव म्हणाले की, हा उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होत असल्यामुळे एमएमआरडीएमार्फत महानगरातील वाहतुकीच्या सुलभतेमध्ये अजून एक महत्वाचे योगदान दिले जात आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरील विद्यमान अंधेरी- घाटकोपर जंक्शन हे सर्वात जास्त वाहतुकीच्या वर्दळीच्या स्थानापैकी एक होते. या नवीन उड्डाणपुलामुळे वाहतूक विभागली जाईल आणि त्यामुळे जंक्शनवरील वाहतुकीची वर्दळ आणि कोंडी कमी होईल.

ते पुढे म्हणाले की, "प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित ड्राइव्ह करण्यासाठी दररोज हा उड्डाणपूल व्यापकपणे वापरला जाईल. यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास आहे. ६९३ मीटर लांबीचा हा उड्डाणपूल ३३.०४ कोटी रुपये किमतीमध्ये पूर्ण करण्यात आला. कोविड साथीच्या काळात अनेक अडचणी येत असतानाही एमएमआरडीए टीम आणि नियुक्त कंत्राटदाराने समर्पणाने केलेल्या कामाचे हे प्रतीक आहे.

टॅग्स :मुंबई