नवी मुंबई : पामबीच, ठाणो - बेलापूर रोड व महामार्गावर वारंवार होणारे अपघात लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेने सप्टेंबरमध्ये अत्याधुनिक फॅक मोबाइल रुग्णसेवेचे उद्घाटन केले होते. मात्र तब्बल दीड महिना झाल्यानंतरही प्रत्यक्षात ही सुविधा सुरू झाली नसून, ही वाहने वाशीमध्ये धूळखात उभी आहेत. फक्त प्रसिद्धीसाठीच उद्घाटनाची घाई केल्याची टीका महापालिकेवर होऊ लागली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रतील पामबीच, ठाणो - बेलापूर रोड व महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावा लागतो. यामुळेच महापालिकेने अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देणारी मोबाइल रुग्णसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. फ्लोटिंग अॅडव्हान्स कॅज्युलिटी कॉम्प्लेक्स (फॅक) सेवेसाठी पालिकेने दोन अत्याधुनिक वाहने खरेदी केली आहेत. या वाहनांमध्ये अल्ट्रा सोनोग्राफी मशिन, एक्सरे व इतर सुविधा असणार आहेत. तज्ज्ञ डॉक्टरही उपलब्ध करून दिले जाणार होते. महापालिकेने 8 सप्टेंबरला या सुविधेचा शुभारंभ केला होता. परंतु उद्घाटन होऊनही प्रत्यक्ष याची सेवा सुरू झालेली नाही. दोन्ही वाहने वाशी सेक्टर 6 मधील एनएमएमटी बस आगाराच्या कोप:यात उभी केली आहेत.
महापालिकेने अद्याप फॅक व्हॅनच्या ठेकेदारांना कार्यवाही करण्यासाठीचे आदेशच दिलेले नाहीत. पामबीच रोड व ठाणो - बेलापूर रोडवर या सुविधेविषयी माहिती फलक लावण्यात येणार होते. हेल्पलाइन नंबरही प्रसिद्ध केला जाणार होता. परंतु मागील दीड महिन्यात याविषयी कोणतीच उपाययोजना झालेली नाही. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. जर फॅक व्हॅनची सुविधा सुरू केली नाही तर उद्घाटनाची घाई कशाला केली, असा प्रश्न नाराज असलेले नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
फॅक व्हॅनची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध केला जाणार आहे. पामबीच रोड व ठाणो - बेलापूर रोडवर माहिती फलकही लावण्यात येतील.
- डॉ. दीपक परोपकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका