Join us

लवकरच 7,800 टॅक्सी धावणार

By admin | Updated: August 7, 2014 01:49 IST

टॅक्सींची असलेली कमतरता पाहता परिवहन विभागाकडून लवकरच आणखी 7,800 टॅक्सी परवाने दिले जाणार आहेत.

मुंबई : टॅक्सींची असलेली कमतरता पाहता परिवहन विभागाकडून लवकरच आणखी 7,800 टॅक्सी परवाने दिले जाणार आहेत. याबाबतची सूचना बुधवारी परिवहन सचिवांकडून परिवहन आयुक्त कार्यालयाला  जारी करण्यात आली. या सूचनेमुळे परवान्यांच्या प्रक्रियेला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. मृत परवान्यांचे नूतनीकरण करुन ते नव्याने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हे परवाने मुंबई महानगर क्षेत्रसाठी असून, त्यामुळे रस्त्यावर अधिक टॅक्सी धावू शकतील. 
सध्या 35 हजार टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. साधारण पाच ते सात वर्षापूर्वी याच टॅक्सींची संख्या जवळपास 50 हजार एवढी होती. मात्र अल्पावधीतच टॅक्सी कमी धावू लागल्याने प्रवाशांना मनस्ताप होऊ लागला. हे पाहता सरकारकडे असलेल्या मृत परवान्यांचे नूतनीकरण करुन ते नव्याने देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार परिवहन विभागाकडून नुकतेच रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात आले. यानंतर टॅक्सी परवान्यांच्या वाटपासाठी टॅक्सी संघटनांकडून तगादा लावण्यात आला. टॅक्सींची कमतरता आणि संघटनेकडून करण्यात येत असलेली मागणी पाहता टॅक्सींचे 15 हजार 600 मृत परवान्यांचे नूतनीकरण करुन ते देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला मृत 7,800 परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्याची सूचनाच आज परिवहन आयुक्त कार्यालयाला जारी करण्यात आली. याबाबत परिवहन सचिव शैलेश कुमार शर्मा यांनी सांगितले, की परिवहन आयुक्तालयाला सूचना मिळाली आहे. मुंबई महानगर क्षेत्र म्हणजेच मुंबईसह, नवी मुंबई, ठाणो, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मिरारोड-भाईंदरसाठी हे परवाने असतील. (प्रतिनिधी)
 
रिक्षांचेही डेड परवान्यांचे नूतनीकरण करुन ऑनलाइन पद्धतीने एक वर्षापूर्वी यशस्वीरीत्या वाटप करण्यात आले. त्याच प्रकारे टॅक्सी परवान्यांचे ऑनलाइन पद्धतीने वाटप केले जाणार आहे.
 
या टॅक्सी परवान्यांसाठी परिवहन विभागाकडून जाहिरात काढली जाईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रियेस सुरुवात होईल. आठवी पास आणि 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, तसेच गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसल्याचे पोलिसांकडून प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागतील.
 
लवकरच या परवान्यांच्या प्रक्रियेला सुरुवात करू. रिक्षा परवान्यांचे वाटप ऑनलाइन पद्धतीने झाले, त्याच पद्धतीने या परवान्यांचेही वाटप होईल. मुंबई महानगर क्षेत्रसाठी हे परवाने देण्यात येणार आहेत. यात आचारसंहितेची समस्यादेखील नसेल. त्यामुळे लवकरच टॅक्सी परवान्यांचे वाटप होईल, असे अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.