लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. ६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेगावॅट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती केली जाईल. शिवाय १ हजार ८०० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून ऊर्जानिर्मितीचा आणखी एक प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ६५ कोटींची तरतूद आहे.
मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील कचऱ्यावर तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन पुनर्प्राप्त केली जाईल. २४ लाख २३ हजार टन कचऱ्याचे बायोमायनिंग आणि विल्हेवाट लावण्याचे नियोजन आहे. यासाठी ७५ कोटींची तरतूद आहे.
मुंबईतील बांधकाम, निष्कासनामधून निर्माण होणाऱ्या १ हजार २०० टन प्रतिदिन डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासह प्रक्रिया करण्यासाठी १ कोटींची तरतूद आहे. देवनार आणि मुलुंड क्षेपण भूमी येथे संरक्षक भिंत बांधण्यात येणार असून, रस्ते, कलव्हर्ट, बांध इत्यादी कामांसाठी १९ कोटींची तरतूद आहे.
ठाणे येथे जमीन संपादनाचे काम सुरू आहे. शासनाने ३० एकर जमिनीचा ताबा मुंबई महापालिकेला दिला आहे. येथे संरक्षक भिंत बांधली जाईल. यासाठी १० कोटींची तरतूद आहे. एकूण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी १९१.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.