Join us

पर्यटनातील सामाजिक, सांस्कृतिक दृष्टिकोन महत्त्वाचा

By admin | Updated: March 17, 2017 05:03 IST

पर्यटन हा जगातील सर्वांत मोठा उद्योग आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही पर्यटन महत्त्वाचे असून, लोकांच्या मनोरंजनाचेही हे मुख्य साधन आहे.

मुंबई : पर्यटन हा जगातील सर्वांत मोठा उद्योग आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही पर्यटन महत्त्वाचे असून, लोकांच्या मनोरंजनाचेही हे मुख्य साधन आहे. पर्यटन समाजातील कोणत्या वर्गाला प्रभावित करतो, त्यातून समाजात बदल घडत असतात, त्यामुळे या विषयाकडे नव्या संदर्भासह बघणे आवश्यक आहे. पर्यटन हे सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समजावून घेणे गरजेचे असल्याचा सूर आंतरराष्ट्रीय पर्यटन परिषदेत व्यक्त झाला. विलेपार्ले येथील मणिबेन नानावटी महिला महाविद्यालयात ही आंतरराष्ट्रीय परिषद सुरू झाली. या परिषदेत जयपूर येथील थार संस्थेचे संचालक डॉ. सुधीर सोनी, उज्जैनमधील विक्रम महाविद्यालयाचे प्रा. हरीमोहन बुधौलिया, दिल्लीचे साहित्य अकादमी सदस्य प्राचार्य सूर्यप्रसाद दीक्षित आदी दिग्गज या परिषदेत उपस्थित होते. पर्यटनाच्या माध्यमातून नवीन ठिकाणांचा शोध लागत असतो. यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन साधने जोडली जात आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचा विविध अंगाने आढावा घेण्यात आला. पर्यटनाच्या संदर्भातील अनेक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. देश-विदेशातील पर्यटक, साहित्यकार, समाजशास्त्रज्ञ, समीक्षक, कलाकार, चित्रपट निर्माते, अभिनेता या क्षेत्रातील दिग्गजांच्या दृष्टिकोनातून पर्यटनाचे विविध पैलू समजावून घेण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, १७ मार्च रोजी परिषदेचा दुसरा दिवस आहे. (प्रतिनिधी)