Join us  

... तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, चंद्रकांत पाटलांचे रश्मी ठाकरेंना पत्र

By महेश गलांडे | Published: January 02, 2021 8:20 PM

मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता.

ठळक मुद्देमी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता.

मुंबई - भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधण्यात आला होता. त्यावरुन, चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सांगितलं होतं. त्यानुसार, पाटील यांनी आज रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं असून ते सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअरही करण्यात आलंय. त्यामुळे, आता रश्मी ठाकरे या पत्राची दखल घेणार का हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

"मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो," असं पाटील म्हणाले होते. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादका असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं. आता, पाटील यांनी रश्मी ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. आपल्या पत्रात पाटील यांनी शेवटच्या ओळीत रश्मी ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या आहेत. 

रश्मी ठाकरे यांना व्यक्ती म्हणून मी चांगला ओळखतो व मला खात्री आहे की, त्यांनाही ही भाषा आवडत नसेल. संपादक या नात्याने त्या या गोष्टींचा नक्की विचार करतील. तसेच, माझी ही विनंती योग्य वाटत नसेल आणि आपल्या सामना वृत्तपत्रातील भाषा योग्य वाटत असेल तर तुम्ही ते खुशाल सुरू ठेवू शकता, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा ! असं पाटील यांनी रश्मी ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. 

संजय राऊत यांची टीका

चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहिणार असल्याचे सांगितल्यानंतर, शिवसेना नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. जर चंद्रकांत पाटील हे सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील असं म्हणत राऊत यांनी त्यांना टोला लगावला होता. "चंद्रकांत पाटील कालपर्यंत सामना वाचत नव्हते. आज ते वाचायला लागले हिच मोठी बाब आहे. जर ते सामना वाचत राहतील तर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होती. सकारात्मक दृष्टीकोनातून ते महाराष्ट्र आणि देशाकडे पाहतील. सामना वाचत राहतील तर त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टिकेल, असा विश्वासही त्यांना येईल," असं राऊत म्हणाले. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलशिवसेनासंजय राऊत