Join us  

म्हणून पवार अनपेक्षितपणे 'राजभवन'वर गेले; राज्यपाल 'शरदबाबूं'ना म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 9:10 AM

शरद पवार आपल्याला एकदाही भेटायला आले नाहीत, असे मत राज्यपालांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केले होते.

अतुल कुलकर्णी मुंबई : शरदबाबू, आप तो स्टेट्समन है... राज्य सरकार के कामकाज मे दखल दिजीये, अशी सूचना राज्यपाल भगतसिंग कोष्यारी यांनी केली. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी री यांची सदिच्छा भेट घेतली. अचानक शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल हे राजभवनावर पोहोचल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आपल्याला एकदाही भेटायला आले नाहीत, असे मत राज्यपालांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे व्यक्त केले होते.

प्रफुल्ल पटेल आणि राज्यपालांचे जुने संबंध आहेत. दोघांमध्ये चांगली ओळख आहे. त्यातून त्या दोघांमध्ये ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यावर पटेल यांनी, आपण शरद पवार यांना चहाचे निमंत्रण द्या, अशी सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर आजची भेट झाल्याचे वृत्त आहे. आजच्या भेटीत राज्यपालांनी शरद पवार यांची तारीफ केली. आपण स्टेटसमन आहात, आपला राजकारणातला अनुभव मोठा आहे. आपण राज्य सरकारच्या कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे, अशी सूचनाही राज्यपालांनी केली. त्यावर शरद पवार यांनी, मी सहसा कोणाच्या कामात दखल देत नाही, जर कोणी विचारले तरच सल्ला देतो, असे मिश्किल उत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी देखील एका मंत्र्याने शपथेचा मजकूर वगळून अन्य काही विधाने केली. त्यावर चिडलेल्या राज्यपालांनी समोरच बसलेल्या शरद पवार यांच्याकडे हात दाखवत, शरदबाबू जैसे सीनियर नेता यहा पर है, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यापासून शरद पवार एकदाही त्यांना भेटायला गेले नव्हते. त्यांची ही पहिलीच भेट होती. या भेटी संबंधी प्रफुल्ल पटेल यांना विचारले असता, ते म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. राज्यपालांनी चहाचे आमंत्रण दिले होते. आम्ही भेटलो. आमच्यात सहज साध्या गप्पा झाल्या. त्यापलीकडे काहीही घडले नाही.

टॅग्स :शरद पवारप्रफुल्ल पटेल