चतुर्थश्रेणी कामगार महासंघाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राज्यभर कडकडीत बंद पाळला. विविध कार्यालयांबाहेर कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा देत आपला निषेध नोंदवला आहे. मागण्यांबाबत कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र असून, सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा राज्य सरकारी चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कामगार महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी दिला.
राज्य शासनाने शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस देऊनही कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी केला. सहभाग दिला. संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारच्या सुट्टीत निदर्शने करण्यात आली, तर त्याच्या आदल्या दिवशी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला. पण शासनाने त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे हा संप अटळ होता. यावरून शासनाला कर्मचाऱ्यांविषयी सहानुभूती नसल्याचे दिसून येते, अशी नाराजी भाऊसाहेब पठाण यांनी व्यक्त केली. वर्ग ४ ची पदे निरसित करू नये, याबाबतचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्त्वावरील पदे त्वरित भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आरोग्य सेवेतील ९२५ चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून शासनसेवेत कायम करावे, अशा विविध स्वरूपाच्या २५ मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या असून, त्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी संघटनेने केली.