Join us  

...म्हणून वडिलांनीच केला ‘निनावी कॉल’; बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्याविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 2:21 AM

मुंबई : पोलिसांना निनावी फोन येण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याला धडा शिकविण्यासाठी तिच्या वडिलांनीच ...

मुंबई : पोलिसांना निनावी फोन येण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. मात्र आपल्या मुलीला त्रास देणाऱ्याला धडा शिकविण्यासाठी तिच्या वडिलांनीच निनावी फोन करत, कॉलरचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला आणि त्या क्रमांकावरून मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याचे सांगितले गेल्याची माहिती दिली. मात्र तपासाअंती तो ‘हॉक्स कॉल’ असल्याचे उघडकीस आले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कक्ष ११ या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

मुंबईत विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार आहेत. एका इसमाने मला फोन करून याबाबत सांगितले, अशी माहिती ४५ वर्षांच्या रमेश (नावात बदल) यांनी पोलिसांना दिली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत कक्ष ११ चे प्रमुख चिमाजी आढाव यांच्या पथकाने चौकशी करीत वांद्रे परिसरातून सागर (नावात बदल) नामक टेलरला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा याबाबत त्याला काहीच कल्पना नसल्याचे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. तेव्हा पुन्हा रमेशकडे याबाबत विचारणा केली. त्याने पोलिसांना सांगितलेली हकिकत ऐकून तेदेखील अवाक् झाले. रमेश यांना एक मुलगी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तिला सागरच्या मोबाइल क्रमांकावरून फोन येत होता. त्यामुळे त्रासलेल्या मुलीने वडिलांना हा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी याची तक्रार चारकोप पोलिसांकडे केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करीत रमेश यांच्या मुलीला त्याचा मोबाइल क्रमांक ब्लॉक करण्यास सांगितले.

तसेच याची तक्रार सायबर सेलला देण्याचेदेखील सुचविले. तिने तसे केल्यानंतर काही दिवस सर्व शांत होते; मात्र काही दिवसांनी तिला पुन्हा फोन येण्यास सुरुवात झाली. हे रमेशना समजले तेव्हा त्यांनी सागरचा मोबाइल क्रमांक पोलिसांना देत त्यावरून शहरात घातपाताच्या धमकीचा कॉल आल्याचे सांगितले. त्यानुसार रमेश यांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

टॅग्स :मुंबई पोलीसपोलिसमोबाइलफेक न्यूजमुंबई