Join us
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून आतापर्यंत राज्याला मिळाले २ कोटी ९७ लाख लसींचे डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. देशात महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. देशात महाराष्ट्र लसीकरण मोहिमेत आघाडीवर असून, आतापर्यंत ४ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी केंद्राकडून राज्याला आतापर्यंत २ कोटी ९७ लाख ७४ हजार ९३० लसींचे डोस मिळाले आहेत.

केंद्राकडून राज्याला मिळालेल्या या एकूण डोसमध्ये २ कोटी ५६ लाख ८८ हजार ५६० कोविशिल्ड लसींच्या डोसचा समावेश आहे, तर ४ लाख ८६ हजार ३७० कोव्हॅक्सिन लसींच्या डोसचा समावेश आहे. दुसरीकडे राज्याने २० लाख ३१ हजार ५८० कोविशिल्ड तर ४ लाख ७९ हजार १५० कोव्हॅक्सिन लसींचे असे एकूण २५ लाख १० हजार ७३० लसींचे डोस मिळवले.

राज्यात कोविशिल्डचे एकूण २ कोटी ७७ लाख २० हजार १४० डोस मिळाले आहेत, तर कोव्हॅक्सिनचे ४५ लाख ६५ हजार ५२० डोस मिळाले आहेत. दोन्ही लसींचे मिळून आतापर्यंत ३ कोटी २२ लाख ८५ हजार ६६० लसींचे डोस राज्याने वापरले आहेत.

मुंबईतही लसीकरण मोहिमेला वेग येत आहे. यासंबंधी पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोविशिल्डचे ६१ लाख ६ हजार २३५ आणि कोव्हॅक्सिनचे ४ लाख १० हजार ३०२ तर स्पुतनिकचे ८ हजार ३०४ डोस मुंबईकरांनी घेतले आहेत. पहिला डोस जवळपास ५५ टक्के नागरिकांनी घेतला, तर दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या सुमारे १५ टक्के आहे. आतापर्यंत एकूण ६५ लाख २४ हजार ८४१ नागरिकांना कोरोनाचा डोस मिळाला आहे. त्यापैकी १४ लाख ९६ हजार ५९६ मुंबईकरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर, ५० लाख २८ हजार ३४३ मुंबईकरांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. १५ लाखांपैकी १८ वर्षांवरील ७० हजार ५५ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. ४५ वर्षांवरील ११ लाख ३६ हजार ९४३ नागरिकांना आणि ६० वर्षांवरील ५ लाख ५८ हजार ७४० नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

याव्यतिरिक्त, २ लाख ८० हजार ५५४ फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.