Join us

विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत २६ कोटी दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST

मुंबई : दहा महिन्यांनंतर लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सोमवारपासून सुरू झाली. मात्र, सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात ...

मुंबई : दहा महिन्यांनंतर लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सोमवारपासून सुरू झाली. मात्र, सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही विनामास्क फिरणारे दररोज शेकडो लोक पालिकेच्या पथकाला आढळून येत आहेत. आतापर्यंत १२ लाख ९४ हजार ३१२ लोकांना विना मास्क पकडून त्यांच्याकडून २६ कोटी २४ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने एप्रिल २०२० पासून तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतरही अनेक ठिकाणी शेकडो नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीत विनामास्क प्रवेश नाकारण्यात आला. परंतु, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विनामास्क अथवा चुकीच्या पद्धतीने मास्क लावून फिरणारे वाढले आहेत.

पालिका कर्मचारी-अधिकारी आणि क्लिनअप मार्शलच्या माध्यमातून मुंबईत अशा लोकांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. शुक्रवारी १३ हजार १६२ जणांकडून २६ लाख ३२ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर आतापर्यंत पालिकेने सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या आठ हजार ३८४ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख ४६ हजार ९०० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.