मुंबई : जनतेला अनेक मोठ-मोठी आश्वासने देवून सत्तेत आलले भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार जनतेला दिलासा देण्यात अपयशी ठरले असून गेल्या १०० दिवसांत सरकारने कोणतीही ठोस कृती केली नाही. सरकारमधील नेते केवळ टिष्ट्वटर वरुन विकासाच्या घोषणा करतात, पण प्रत्यक्षात एक टक्काही काम होत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.महायुती सरकारच्या शंभर दिवसाच्या कारभारावर तटकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज अद्याप दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेले नाही. केंद्राने इतर राज्यांना दोनदा पॅकेज जाहीर केले आहे. परंतु महाराष्ट्राला एकदाही मदत केलेली नाही. आघाडी सरकारने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या काळात वेळोवेळी मदत केली होती. मात्र भाजपा सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत दिलेली नाही. दुध, सोयाबीन, कापूस, ऊस पिकांच्या दराच्या प्रश्नांवर सरकार दुर्लक्ष केले आहे. या सरकारने अद्याप भात खरेदी केंद्रे सुरु केलेली नाहीत.आघाडी सरकारच्या काळात भाताला दिला जाणारा बोनसदेखील या सरकारने बंद केला आहे. तसेच अन्न सुरक्षा योजनेतंर्गत एपीएल रेशन कार्ड धारकांना आघाडी सरकारने दिलेला लाभ या सरकारने बंद केला असून याचा फटका राज्यातील १ कोटी ७५ लाख लाभार्थ्यांना बसला आहे. एकंदरीतच भाजपा-शिवसेना महायुतीच्या सरकारचा १०० दिवसाचा कारभार भ्रमनिरास करणारा ठरला आहे असेही तटकरे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
‘हे तर टिष्ट्वटरवर चालणारे सरकार!’
By admin | Updated: February 6, 2015 01:43 IST