अनंत जाधव- सावंतवाडी -- आंबोलीसह सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या नरक्या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. राज्य सरकारने या वनस्पतीची नोंद दुर्मीळ वनस्पती म्हणून केली आहे. तरिही या तस्करीकडे वनविभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याने या वनस्पतीच्या तस्करीत वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी नरक्याच्या तस्करीचा प्रकार उजेडात आणल्यानंतर आंबोलीतून नरक्याची तस्करी होत असल्याचे पुढे आले आहे.नरक्या ही दुर्मीळ वनस्पती असूून या वनस्पतीचा वापर सर्रास कॅन्सरच्या औषधासाठी केला जातो. ही वनस्पती सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्यातल्या त्यात आंबोलीच्या मुख्य धबधब्यापासून ही वनस्पती दिसू लागते. आंबोली, चौकुळ या वन्य क्षेत्राबरोबर खासगी क्षेत्रातही या वनस्पतीचे अस्तित्व आहे. काही वर्षापूर्वी या वनस्पतीची आंबोलीतून मोठ्या प्रमाणात तोड होऊ लागल्याचे वनविभागाच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत कारवाई केली. तसेच काही तस्करांवर गुन्हेही दाखल केले.पण अलिकडच्या काही वर्षात ही वनस्पती सर्वांना आंदण दिल्यासारखी झाली आहे. शासनाने या वनस्पतीची नोंद ही दुर्मीळ वनस्पती म्हणून केली आहे. वनविभागाने या वनस्पतीचे संरक्षण करावे, असे स्पष्ट आदेश शासनाचे आहेत. पण या आदेशाला केराची टोपली दाखवत अधिकारी व तस्कर संगनमत करून ही वनस्पती रातोरात तोडून घेऊन जात असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही. आठवड्यापूर्वी गगनबावड्यातून नरक्याची तस्करी करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा असे प्रकार अन्यत्रही घडत असल्याचे लक्षात आले. वनविभागानेही या प्रकारानंतर सतर्कता दाखवत तातडीने कारवाई केली. पण आंबोलीत मोठ्या प्रमाणात नरक्या वनस्पती असून त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.नरक्या या दुर्मीळ वनस्पतीची गणना औषधी वनस्पती म्हणून करण्यात आलेली आहे. या वनस्पती पासून कॅन्सरवरील औषध तयार करण्यात येते. हे औषध तयार करत असताना ही वनस्पती चांगल्यापैकी सुकविली जाते. त्यानंतर तिची पावडर बनवून त्यावर प्रक्रिया केली जाते व त्यानंतर औषध बनवले जाते. या औषधाला शासनमान्यता नसून छुप्यारितीने हे औषध बनविले जात आहे. अनेकवेळा शासनाने अशा औषधांवर धाडीही टाकून कारवाई केली आहे. योग्य माहिती मिळाल्यास कारवाई करुआंबोली परिसरात होत असलेल्या नरक्या वनस्पतीच्या तस्करीबाबत वनविभागाच्या फिरत्या पथकाचे सहाय्यक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला अशा तस्करीबाबत कोणतीही सूचना मिळालेली नाही. पण आम्हाला योग्य माहिती मिळाल्यास नक्की कारवाई करु. आंबोलीत नरक्या वनस्पती मुबलक प्रमाणात असून या वनस्पतीवर बारीक लक्ष आहे. त्याची तस्करी होईल, असे आम्हाला वाटत नसल्याचेही बागेवाडी यांनी स्पष्ट केले आहे.
नरक्या वनस्पतीची तस्करी
By admin | Updated: August 11, 2014 00:11 IST