Join us

खैराच्या लाकडांची तस्करी

By admin | Updated: November 2, 2014 23:53 IST

तालुक्यातील कळंब भागातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करण्याचा मार्ग असल्याने चोरट्या मार्गाने तस्करी होतच असते. मुरबाड रस्त्याचा वापर करून ही तस्करी केली जाते.

कर्जत : तालुक्यातील कळंब भागातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करण्याचा मार्ग असल्याने चोरट्या मार्गाने तस्करी होतच असते. मुरबाड रस्त्याचा वापर करून ही तस्करी केली जाते. अशीच तस्करी कळंब येथील वन विभागाचे वनपाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पकडली. कळंब मार्गे मौल्यवान झाडे नेणार असल्याचे समजताच त्यांनी फिरतीवर आलेल्या दक्षता विभागाचे अधिकारी एस.पी. पाटील यांच्यासह चोरटी गाडी लाकडांसह कळंब येथे पकडली. गाडी आणि खैराची लाकडे वन विभागाच्या पोही डेपो येथे ठेवण्यात आली आहेत. कळंब विभागातील बोरगाव झोनचे वनपाल हरपुडे यांना कळंब येथून खैराची लाकडे टेम्पोमधून मुरबाड मार्गे बाहेर पाठविली जाणार आहेत अशी खबर मिळाली होती. त्यांनी ही माहिती ठाणे वन विभागाच्या दक्षता विभागाचे अधिकारी पाटील आणि कर्जत विभागाचे वनक्षेत्रपाल आर.बी. घाडगे यांना दिली. शुक्र वारी रात्री संशय असलेला हा टेम्पो कळंब- मुरबाड रस्त्यावर उभा होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या टेम्पोची तपासणी केली असता विना परवाना आणि बिगरपास काढलेली लाकडे चोरून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे समोर आले. वन विभागाच्या दक्षता विभागाने तो टेम्पो तेथून पोही डेपोमध्ये नेऊन टेम्पो मालक पानसरे आणि लाकडाचे मालक कोतवालवाडी येथील इतियाज भातभर्डे यांच्यावर गुन्हा दाखल केला. भातभर्डे हे लाकडांचा व्यवसाय करणारे ठेकेदार आहेत. (वार्ताहर)