Join us

तस्कर आरिफ भुजवालाने केली हाेती पत्नीसाेबत पाकवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST

अंडरवर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन : ड्रग्ज तस्करीसाठी दुबईतही अनेक वाऱ्यालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ड्रग्ज तस्करीतील अंडरवर्ल्डमधील मुख्य ...

अंडरवर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन : ड्रग्ज तस्करीसाठी दुबईतही अनेक वाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ड्रग्ज तस्करीतील अंडरवर्ल्डमधील मुख्य सूत्रधार व डी. गँगचा हस्तक आरिफ भुजवाला याच्याकडून अनेक महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. अमली पदार्थांची आयात आणि त्यातील आर्थिक उलाढालीच्या अनुषंगाने अनेक वेळा त्याने दुबई वारी केली असून तेथूनच तो पत्नीसह एकदा पाकिस्तानातही जाऊन आल्याचे समजते. तेथे तो डी. गँगचा प्रमुख दाऊद इब्राहिमला भेटण्यासाठी गेला असल्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्या पाक भेटीबाबत अधिक तपशील मिळविण्यात येत असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम आणि कैलास राजपूत हे तस्करीचा व्यवसाय सांभाळत आहेत. भुजवाला हा त्यांच्या सातत्याने संपर्कात हाेता. त्यांच्या सूचनेनुसार पाकला गेला होता. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. गेल्यावर्षी व्हाया दुबई त्याने ही सहल केल्याचे सांगितले जाते. तो कोणत्या पासपोर्टच्या आधारे गेला, त्याचे तेथील वास्तव्य, भेटीगाठी याबाबत अधिक माहिती मिळविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) चिकू पठाणला घणसोली येथून अटक केल्यानंतर डोंगरीतील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या अड्ड्याचा पर्दाफाश झाला. पथकाने नूर मंझिलमधील अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त करून २ कोटींच्या रोकडीसह अनेक किलो ड्रग्ज व ते तयार करण्यासाठी लागणाऱ्या रासायनिक द्रव्याचा साठा मोठ्या जप्त केला हाेता. त्यावेळी फरार झालेल्या भुजवालाला सोमवारी एनसीबीच्या पथकाने रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. कोठडीची मुदत शनिवारपर्यंत वाढवण्यात आल्याने अनेक महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

.....................