Join us

लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे सर करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:05 IST

एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांच्या अधिपत्याखाली आज ७०० ते ...

एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील काही पारंपरिक विद्यापीठांच्या अधिपत्याखाली आज ७०० ते ८०० महाविद्यालये संलग्न आहेत. अशावेळी विद्यापीठांचे व्यवस्थापन करणे कठीण जाते. त्याउलट लहान आकाराच्या समूह विद्यापीठांचे व्यवस्थापन सुलभ पद्धतीने होते; तसेच गुणवत्ता राखणे, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम राबविणे शक्य होते. राज्यातील चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठे तयार केल्यास अशी लहान विद्यापीठे प्रगतीची शिखरे निश्चितच सर करतील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे.

नव्याने सुरू झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे झाली. बैठकीला एचएसएनसी विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, कुलगुरू डॉ. दिनेश पंजवानी, एचएसएनसी मंडळाचे अध्यक्ष किशु मनसुखानी, विश्वस्त अनिल हरीश, मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र व विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवायचे आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये आई-वडिलांनंतर शिक्षकांना महत्त्वाचे स्थान आहे, शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

एचएसएनसी विद्यापीठामध्ये एच. आर. महाविद्यालय, के. सी. महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज या महाविद्यालयांचा समावेश असून, कोरोना काळात सर्व महाविद्यालयांनी आपले संपूर्ण अभ्यासक्रम दूरस्थ पद्धतीने पूर्ण केले तसेच परीक्षा यशस्वीरीत्या घेतल्या, अशी माहिती निरंजन हिरानंदानी यांनी दिली.