मुंबई : सुरक्षेला असणारा धोका, धावपट्टीचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली राबविण्यात येत असलेल्या पुनर्विकास प्रकल्पात, विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांनाच डावलण्यात येत आहे. त्या जागी सत्ताधारी भाजपाचे मंत्री आणि नेत्यांच्या विभागातील अन्य प्रकल्पबाधितांना घरांच्या चाव्या वाटण्यात येत आहेत. येत्या तीन महिन्यांत विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन न केल्यास, या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. मुंबई विमानतळालगत असणाऱ्या जरीमरी भागातील इंदिरानगर, विजयनगर, सेवकनगर, गांधीनगर, तसेच कुर्ला पश्चिमेच्या क्रांतीनगर, संदेशनगर परिसरातील झोपड्यांमुळे विमानतळाला असलेला धोका लक्षात घेत, २००५ साली पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला. पात्रता निश्चित करण्यासाठी तब्बल तीन वेळा विमानतळ परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी विद्याविहार पश्चिमेस इमारतीही उभ्या राहिल्या. तीन वर्षांपासून या इमारतींमधील सदनिका वाटपाविना पडून आहेत. विमानतळ प्राधिकरणातील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये १७ हजार कुटुंबांचे पुनर्वसन शक्य आहे. मात्र, विमानतळालगतच्या झोपडपट्टीवासियांनाच यात डावलण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी मुंबईतील अन्य प्रकल्पग्रस्तांना विशेषत: सत्ताधारी भाजपातील शक्तिशाली नेत्यांच्या भागातील कुटुंबांच्या पुनर्वसनाचा घाट घालण्यात येत आहे. अलीकडेच घाटकोपर पाइपलाइनवरील ४५० कुटुंबीयांना येथील सदनिका वाटण्यात आल्या. आतापर्यंत विमानतळ प्राधिकरणाबाहेरील एकूण २ हजार कुटुंबीयांना येथील सदनिका वितरित करण्यात आल्या आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या प्रकल्पात बाहेरील लोकांची घुसखोरी तातडीने थांबवावी, तीन महिन्यात विमानतळ परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस नेते आणि स्थानिक आमदार नसीम खान यांनी दिला आहे. अलीकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेऊन, तातडीने पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. मार्चपर्यंत स्थानिकांचे पुनर्वसन न झाल्यास, या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. त्याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही नसीम खान यांनी दिला. (प्रतिनिधी)
झोपडपट्टीवासीयांना डावलले
By admin | Updated: January 9, 2017 07:08 IST