Join us

ढालकाठी-खरवली पूल धोकादायक

By admin | Updated: May 12, 2015 03:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडी ढालकाठी-खरवली पूल धोकादायक स्थितीमध्ये असून ऐन पावसाळ्यात संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी ढालकाठी-खरवली पूल धोकादायक स्थितीमध्ये असून ऐन पावसाळ्यात संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. दुरुस्ती-देखभालीचा अभाव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे वाहतुकीकरिता धोकादायक बनला आहे. ऐन पावसाळ्यात या ठिकाणचा संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पुलावरून पुणे, महाड बससेवा तसेच रामदास स्वामींचे दासबोधाचे ठिकाण असलेले शिवथरघळ, पिंपळवाडी, वरंध या ठिकाणी जाणाऱ्या वाहतुकीकरिता हा पूल महत्त्वाचा आहे. या पुलाचा वापर केल्यास महाडकडे येण्याचे ५ किमीचे अंतर कमी होते. औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणाऱ्या कामगारांनादेखील हा पूल वाहतुकीकरिता सोयीचा आहे. मात्र या पुलाची योग्य डागडुजी होत नसल्याने सदरचा पूल वाहतुकीकरिता धोकादायक बनला आहे. अवजड वाहने या पुलावरून गेल्यास पूल हलण्याचा प्रकार वारंवार घडत असतो. या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने मोटारसायकलचालकांना या पुलावरून येताना तारेवरची कसरत करावी लागते. या पुलाच्या शेजारील नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून ठेकेदार मिळत नसल्याने काम रखडले आहे.