Join us
Daily Top 2Weekly Top 5

चारकोपमध्ये तिवरांची कत्तल सुरूच

By admin | Updated: January 6, 2016 01:20 IST

चारकोप परिसरातील तिवरांची कत्तल, जाळण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येऊनही येथील भूमाफियांच्या कारवायांकडे पोलीस, महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणा

मुंबई : चारकोप परिसरातील तिवरांची कत्तल, जाळण्याचे प्रकार वारंवार उघडकीस येऊनही येथील भूमाफियांच्या कारवायांकडे पोलीस, महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने भूमाफियांचा बेदरकारपणा अधिकच वाढला असून अद्यापही तिवरांची राजरोस कत्तल करीत भरणी करून बेकायदा झोपड्या बांधण्याचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे याबाबत येथील सामाजिक संस्थांनी लेखी तक्रारी करूनही त्याची दाद घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.सध्या चारकोप पोलीस ठाण्यापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावरील लक्ष्मीनगर परिसरात भूमाफियांनी अतिक्रमण करीत हैदोस घातला आहे. तिवरांची कत्तल करून त्या ठिकाणी भरणी केली जात आहे. या जागेत खोल्या, गॅरेज, चाळी उभारल्या जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एका राजकीय पक्षाचे कार्यालयही भरणी केलेल्या जागेत उभारण्यात आले आहे. राजरोसपणे हे अतिक्रमण होत असताना पोलीस आणि पालिका विभाग कार्यालय याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अखेर युनायटेड असोसिएशन फॉर सोशल, एज्युकेशनल अ‍ॅण्ड पब्लिक वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष रेजी अब्राहम आणि कार्यकर्त्यांनी या अतिक्रमणाची छायाचित्रे काढून ती महापालिका आणि पोलिसांना सादर केली. या प्रकरणातील भूमाफियांची माहितीही या निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे. हे अतिक्रमण म्हणजे तिवरांच्या संरक्षणासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग असतानाही पोलीस आणि महापालिकेच्या आर /दक्षिण आणि आर /मध्य विभाग कार्यालयांचे अधिकारी निष्क्रिय असल्याबाबत पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांकडेही निवेदनाद्वारे तक्रारी करण्यात आल्या आहेत.