Join us  

वांद्रयात जाहिरात 'होल्डिंग' साठी हिरव्यागार झाडांची कत्तल; अनधिकृत असूनही कंत्रादारावर अद्याप गुन्हा नोंद नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 8:11 AM

वांद्रे (पूर्व) सिद्धार्थ कॉलनी येथील भुयारी मार्गासमोर जुने कार्डिनल चर्च आहे. या चर्च परिसरात अनेक हिरवीगार झाडे आहेत.

- श्रीकांत जाधव

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या चाळीस वर्षांपासून शाळेच्या प्रांगणात उभी असलेली हिरवीगार झाडे केवळ खासगी जाहिरातीच्या होल्डिंगसाठी कत्तल करण्यात आल्याची घटना वांद्रे येथील कार्डिनल चर्चमध्ये घडली आहे. शिवाय झाडे कापण्यास आणि होल्डिंगला परवानगी नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र,कंत्राटदाराविरोधात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

वांद्रे (पूर्व) सिद्धार्थ कॉलनी येथील भुयारी मार्गासमोर जुने कार्डिनल चर्च आहे. या चर्च परिसरात अनेक हिरवीगार झाडे आहेत. चर्च पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असल्याने कोठूनही थेट लक्ष चर्चच्या वास्तूवर जाते. त्यामुळे येथील मोक्याच्या जागेत खासगी जाहिरात होल्डिंग उभारण्यात आले आहे. या होल्डिंगला अडथळा येणारी आणि होल्डिंगच्या जागेत असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. शिल्लक झाडांच्या फ़ांद्या कापून झाडे विद्रुप करण्यात आली आहेत. त्यामुळे सहज नजरेस पडणारी कापलेली झाडे पाहून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र,चर्च प्रशासनाचा यामागे हात असल्याची चर्चा येथे सुरू आहे.  

पालिका म्हणते,गुन्हा अजून दाखल नाही याबाबत एच पूर्व महापालिका सहाय्यक उद्यान निरीक्षक यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राटदाराने पालिकेच्या परवानगी शिवाय झाडे कापली आहेत. नागरिकांकडून त्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची खेरवाडी पोलिसांनी दखल घेतली आहे. मात्र,अजून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

होल्डिंग अनिधकृत झाडे कापताना नागरिकांनी विचारणा केली होती. मात्र कंत्रादाराने लोकांना दाद दिली नाही. पालिकेची होल्डिंगची परवनगी कंत्राटदाराने दाखवली नाही. तेव्हा पोलिसांनी त्याची दखल घेतली. झाडे कापण्यासाठी कंत्रादाराने बाहेरून माणसे आणली होती. हे होल्डिंग अनधिकृत असल्याचे येथील रहिवाशी विश्वास जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका